राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पार्टीकडून मोठे प्रयत्न केले जात आहे. महाविकास आघाडीनं आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एकत्रित बोलावलं आहे. संबंधित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित आहेत. याठिकाणी राज्यसभा निवडणुकीबाबत आमदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपानं अपक्षांना मिठी मारली तरी आम्हीच जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार असे दोन उमेदवार उभे करण्यात आले आहेत. दोन्ही संजय निवडणुकीत जिंकतील का? असं विचारलं असताना राऊत म्हणाले की, “चार संजय असते तर चारही संजय जिंकले असते.”

‘महाविकास आघाडी सरकार भेदरलं असून त्यांनी तीन दिवस आधीच आपल्या आमदारांना बंदिस्त केलं आहे, या भाजपाच्या टीकेला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, “आम्ही भेदरलो असेल तर मुंबईतील ताज हॉटेलमध्ये काय सुरू आहे? त्यांनीही आपले आमदार बंदिस्त ठेवले आहेत. भाजपावर तुम्ही कशाला विश्वास ठेवता. ती आत्मविश्वास गमावलेली माणसं आहेत, असंही राऊत यावेळी म्हणाले.

Story img Loader