लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता देशासह राज्यात घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित असं यश मिळवता आलं नाही. महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत घेत मोठं विधान केलं. “महायुतीला महाराष्ट्रात काही जागा कमी आल्या, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो. पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
जनतेनं त्यांना जबाबदारीतून मोकळं केलं आहे. लोकशाहीमध्ये जनता महत्वाची असते. जनतेने नरेंद्र मोदी यांनाही जबाबदारीतून मोकळं केलं आहे. विधानसभेच्या निवडणुका घ्या, महापाहिलकेच्या निवडणुका घ्या, जनता तुम्हाला जबाबदारीतून मोकळं केल्याशिवाय राहणार नाही. नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व असल्यामुळे अशा प्रकारची नौटंकी करण्याची भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सवय आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वरिष्ठांनी अशा प्रकारची भूमिका घ्यायला सांगितली असल्याची माझी माहिती आहे. कारण त्यांना अशाच प्रकारे योगी आदित्यनाथ यांचाही राजीनामा घ्यायचा आहे”, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.
हेही वाचा : “देवेंद्र फडणवीस यांची ‘एक्झिट’ नक्की, आता विनोद तावडे…”, सुषमा अंधारे यांचं सूचक विधान
लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात फक्त ९ जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत. त्याच जागा आधी २३ होत्या. आता ज्या राज्यात भाजपाच्या जागा कमी झाल्या, तेथील नेतृत्वाने राजीनामा द्यावा, हे केंद्राकडून सांगितलं आहे. याच आधारावर उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचाही राजीनामा त्यांना घ्यायचा आहे”, असं संजय राऊतांनी म्हटलं.
“देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की विधानसभेसाठी वेळ मिळावा. विधानसभेला त्यांनी जेवढा वेळ हवा तेवढा घ्यावा. मात्र, १८५ जागा महाविकास आघाडीच्या आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही लोकसभा निवडणुकीत सांगत होतो की, महाविकास आघाडी महाराष्ट्रात ३० जागा जिंकेल, तेवढ्या आम्ही जिंकल्या. आता आम्ही सांगतो महाविकास आघाडी विधानसभेला १८५ जागा जिंकेल. देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारीतून मोकळं व्हावं, कारण महाराष्ट्रात जे पाप करून ठेवलं, ते पाप आता तुमच्या छाताडावर बसेल”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
“महायुतीला महाराष्ट्रात जागा कमी आल्या, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो. मी स्वत: यामध्ये कमी पडलो. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.