राज्यात विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका सुरु आहे. असे असतानाच काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यावरून सूचक भाष्य केलं होतं. त्यासंदर्भात आज शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच आमचा चेहरा आहे, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पुन्हा संजय राऊत यांनीही सूचक विधान केलं. “कोणतंही सरकार बिनचेहऱ्याचं असून नये”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

संजय राऊत काय म्हणाले?

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “आज अनेक असंख्य तरुण बेरोजगार आहेत. महाराष्ट्रातील रोजगार हा गुजरातला पळवला जात आहे. अशी परिस्थिती असताना पुण्यासारख्या शहरात एक पिढी नशेच्या आहारी जाताना दिसत आहे. तरीही त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही ठोस निर्णय घेत नाहीत. पंजाबनंतर पुणे हे ड्रग्सचं केंद्र बनलं आहे. तरीही पुण्याचे पालकमंत्री काही भूमिका घेताना दिसत नाही. या राज्यात ड्रग्ज कोठून येते? याचा शोध घेत कोणी घेत आहे का? पोलिसांनी फक्त कारवाया करण्याचं नाटक केलं. मात्र, राजाश्रय असल्याशिवाय पुण्यासारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणाच ड्रग्सचा व्यवहार शक्य नाही” , असा हल्लाबोल संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केला.

हेही वाचा : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार असहमत; संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले, “एखादी व्यक्ती…”!

मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्यावर सूचक भाष्य

“शरद पवारांचं म्हणणं बरोबर आहे. महाविकास आघाडीला बहुमत मिळेल. याविषयी आमच्या मनात शंका नाही. लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी हे जर पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, हे ठरवलं असतं तर देशभरात किमान इंडिया आघाडीच्या २५ ते ३० जागा वाढल्या असत्या. असं आमचं मत आहे. कोणतंही सरकार किंवा कोणतीही संस्था बिनचेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करत आहोत? हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरेंद्र मोदींना मतदान केलं. आता महाविकास आघाडीचा चेहरा कोण? याविषयी आमच्यामध्ये मतभेद नाहीत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल”, असं संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असावा यावर तुम्ही ठाम आहात? या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “हे आमचं मत आहे. मात्र, महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आहेत. यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावरून आमच्यात मतभेद नाहीत. लोकसभेला महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढल्यानंतर महाराष्ट्रात काय निकाल लागला? हे सर्वांनी पाहिलं. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात एकत्र निवडणुका लढणार आहोत. महाविकास आघाडी कमीत कमी १७५ ते १८० जागा जिंकेल, अशी आम्हाला खात्री आहे”, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.