शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. संबंधित बंडखोर आमदार अद्याप आम्ही शिवसेनेत आहोत, असा दावा करत असले तरी शिवसेनत फूट पडल्याचं स्पष्टपणे दिसत आहेत. ४० आमदार एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पक्षबांधणी करायला सुरुवात केली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. “शिवसेना ही आमच्याच बापाची असून ५० खोके पचणार नाहीत,” असं विधान संजय राऊतांनी केलं आहे.

नाशिकमधील सभेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आजच्या सभेला व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, प्रत्येक शिवसैनिक आणि पदाधिकारी हजर आहे. आणि शिवसैनिकाला तर कुणीही पळवून नेऊ शकत नाही. ४० आमदार म्हणजे शिवसेना नाही. दोन-पाच खासदार इकडे तिकडे गेले म्हणजे शिवसेना हलली असं होत नाही. अजूनही १०० आमदार आणि २५ खासदार निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. बंडखोर आमदारांना ५० खोके पचणार नाहीत.” असंही ते म्हणाले.

हेही वाचा- दिल्लीत खरंच शिवसेना खासदारांची बैठक झाली? कृपाल तुमाणे म्हणतात, “आमचे ५ ते ६ खासदार…!”

बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडताना राऊत म्हणाले की, “आता काय सांगता आमची शिवसेना खरी तुमची शिवसेना खोटी. हा वाद खऱ्या-खोट्यामधील नाही, हा वाद इमान आणि बेईमानीमधील आहे. आता गेलात ना.. तर सुखाने राहा ना…कशाला शिवसेनेचं नाव घेता… सांगा ना आम्ही शिवसेना सोडली… उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. आता कशाला कारणं देताय.”

हेही वाचा- ५० खोके पचणार नाही, शिवसेना सोडून उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला हे सांगून टाका – संजय राऊत

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “बंडखोरी झाल्यानंतर पहिल्या दिवशी बंडखोर आमदारांनी दावा केला की, आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी सांगितलं की, राष्ट्रवादीची लोक आम्हाला निधी देत नव्हते, म्हणून बाहेर पडलो. तिसऱ्या दिवशी सांगितलं उद्धव ठाकरे आम्हाला भेटण्यासाठी वेळ देत नव्हते, म्हणून बाहेर पडलो. चौथ्या दिवशी सांगितलं आदित्य ठाकरे कामात ढवळाढवळ करत होते, म्हणून बाहेर पडलो. पाचव्या दिवशी सांगितलं विठ्ठलाभोवती बडवे जास्त झाले, म्हणून बाहेर पडलो. सहाव्या दिवशी सांगितलं संजय राऊतांमुळे बाहेर पडलो. सातव्या दिवशी सांगितलं शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे, म्हणून बाहेर पडलो. त्यामुळे मी त्यांनी म्हणतो, सर्वांनी एकत्र येऊन शांत बसा, असा मानसिक गोंधळ करू नका, मग ठरवा शिवसेनेतून बाहेर का पडलो, महाराष्ट्रात काय झाडी, डोंगर, हाटील नाहीयेत का?” असा सवालही राऊतांनी यावेळी विचारला.