Sanjay Raut : विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे. पुढच्या दोन महिन्यांमध्ये केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. या माध्यमातून सभा, मेळावे, आढावा बैठका घेत निवडणुकीची रणनीती आखली जात असतानाच दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी निवडणुकीबाबत सूचक भाष्य केलं. ‘आपण ७ ते ८ वेळा निवडणूक लढलो आहोत, त्यामुळे आता निवडणूक लढण्यात रस राहिला नाही’, असं अजित पवारांनी म्हटलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. अजित पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनींही मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, “शरद पवारांची अनेक विधानं मी ऐकले आहेत. त्यांचंही म्हणणं हेच आहे की, अजित पवार सोडून बाकीच्या सर्वांना ते पुन्हा परत घेऊ शकतात. मात्र, अजित पवारांना नाही.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत काय म्हणाले?

“उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र राज्य असं आहे की, महाराष्ट्राने लोकसभेत नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा पराभव केला. यानंतर आम्ही आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत पार पडत आहे. या मेळाव्याला तीनही पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ महाविकास आघाडी फोडणार आहे. आमच्यामध्ये जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही ठरवलं आहे की कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणायचं. या महाराष्ट्रात दरोडेखोरांचं सरकार बसलेलं आहे, या सरकारला हटवायचं आहे”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा : Ajit Pawar : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढवत राज्यातील दरोडेखोरांचं हे सरकार आम्ही हटवणार आहोत. त्यांच्याकडे आमदार आणि खासदार खरेदी करण्यासाठी शंभर-शंभर कोटी कोठून आले? हे पैसे तुमच्या साताऱ्यामधील शेतीत पिकले का? यांचं संपूर्ण राजकारण हे हप्तेबाजीचं राहिलं आहे. ते महाराष्ट्रातून हप्ते जमा करून दिल्लीत देत आहेत. राज्यामधून हप्ते जमा करून दिल्लीत द्यायचे आणि आपलं मुख्यमंत्रीपद टिकवायचं, असं त्यांचं काम सुरु आहे”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला.

अजित पवारांना निवडणुकीत रस राहिला नाही, कारण…

“जे-जे पक्षाला सोडून गेले आहेत, त्यांचा आम्ही निवडणुकीत पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. मी जेव्हा-जेव्हा शरद पवार यांच्याशी चर्चा केली, तसेच जेव्हा-जेव्हा मी शरद पवार यांचे विधानं ऐकले आहेत. त्यांचंही हेच म्हणणं आहे की, अजित पवार सोडून बाकीच्या सर्वांना ते परत घेऊ शकतात. मात्र, अजित पवारांना नाही”, असं मोठं विधान संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात सूचक भाष्य करत “मी ७-८ वेळा निवडणूक लढलो, आता मला रस राहिला नाही”, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी खोचक टीका केली. राऊत म्हणाले, “अजित पवारांना बारामतीत आता रस राहिला नाही. कारण बारामतीमधील लोकांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचा रस पिळून काढला आहे. त्यामुळे ते आता त्यांच्या पुतण्याच्याविरोधात कर्जत-जामखेड मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काहीही झालं तरी ते त्यांच्या घरातील व्यक्तीच्या विरोधातच लढतील”, अशी टीका संजय राऊतांनी अजित पवारांवर केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp sanjay raut on sharad pawar vs ajit pawar and ncp crisis maharashtra politics gkt