मुंबईतील वरळी भागात रविवारी पहाटे भरधाव वेगात कार चालवत मिहीर शाह या तरुणाने दोघांना धडक दिली. यामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मिहीर शाह हा अपघात झाल्यापासून फरार झाला होता. शिंदे गटाचे राजेश शाह यांचा मिहीर शाह हा मुलगा आहे. मिहीर शाह याला पोलिसांनी मंगळवारी अटक केलं. या अपघाताच्या संदर्भात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला. “वरळीतील आरोपीच्या वडीलांचं गुन्हेगारी रेकॉर्ड चेक करा. त्यांचा अंडरवर्ल्ड संबंध आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत काय म्हणाले?

“वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. वरळी हिट अँड रन हे प्रकरण साधारण नाही. पुण्यात जसं पोर्श कार अपघाताचं प्रकरण घडलं होतं तसंच हे वरळीतील प्रकरण आहे. त्या वरळीतील आरोपीच्या वडीलांचं गुन्हेगारी रेकॉर्ड चेक करा.
ते मुख्यमंत्र्‍यांच्या जवळचे व्यक्ती कसे बनले? त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे. त्या आरोपीच्या वडिलांचे गुन्हेगारी रेकॉर्ड सर्वांच्यासमोर आणा. याबाबत मी मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करतो. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कोणते लोक आहेत हे आता तुम्हाला यावरून समजलं असेल. या प्रकरणातील आरोपी नशेत होता. पण ही नशा मेडिकल टेस्टमध्ये येऊ नये, म्हणून तीन दिवस आरोपीला लपून ठेवलं”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा : मिहीर शाहच्या मित्राची ‘ती’ एक चूक अन् पोलिसांनी आवळल्या साऱ्यांच्याच मुसक्या! अटकेचा घटनाक्रम वाचा

विधानपरिषदेच्या निवडणुकीवरुन टीका

विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले,”राज्यसभेच्या वेळेला खुलं मतदान असतं. विधानपरिषदेचं मतदान अशा प्रकारे व्हावं अशी आमची भूमिका कायम राहिलेली आहे. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार प्रज्ञा सातव, जंयत पाटील आणि मिलिंद नार्वेकर आहेत. आम्हाला खात्री आहे की आमचे तीनही उमेदवार निवडून येतील. आता क्रॉस व्होटिंगची भीती सत्ताधाऱ्यांना जास्त आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागले ते पाहता महायुती संपूर्णपणे फेल ठरली. त्यामुळे अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता लागली आहे. त्यामुळे कोणते आमदार काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. आम्ही आमच्या आमदारांबरोबर आहोत. आम्हाला क्रॉस व्होटिंगची भिती नाही. घोडेबाजार थांबवायचा असेल तर महायुतीने त्यांचा उमेदवार मागे घ्यावा. शिंदे गटाकडे दुसरा उमेदवार निवडून येऊन एवढे मते नाहीत”, असं राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp sanjay raut on worli hit and run case accuseds fathers connection with the underworld gkt