केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यामध्ये केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शाह यांचं वक्तव्य पाहून महाविकास आघाडीमधील आघाडीच्या नेत्यांना दया आली आणि आश्चर्य वाटलं, असं राऊत यांनी म्हटलं आहे. शाह यांच्या भाषणातील मुद्द्यांवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरुन राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर भाष्य केलं. यावेळेस त्यांना इंधनावरील करांसंदर्भात विचारण्यात आलं असता पेट्रोल डिझेलचे दर ५० रुपयांनी कमी करण्यासंदर्भात वक्तव्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाह काय म्हणाले होते?
महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली जात होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. राज्यांनीही दर कमी करावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. मात्र महाविकास आघाडीने पेट्रोल-डिझेलऐवजी मद्य स्वस्त केले. याचा जाब कार्यकर्त्यांनी विचारावा, असे शाह यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं होतं.

नक्की वाचा >> संजय राऊत यांचं अमित शाहांना चॅलेंज; म्हणाले, “हिंमत असेल तर भाजपाच्या १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा आणि…”

“पेट्रोल-डिझेलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर…”
इंधनाच्या दरामध्ये कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला नाही. महाराष्ट्र सरकारने इंधनदर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला नाही यासंदर्भातील शाह यांच्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता दर कमी करण्याचा निर्णय पोटनिवडणुकीमधील पराभवानंतर घेण्यात आल्याचं म्हटलं. “दीडशे रुपये वाढवायचे आणि चार रुपये कमी करायचे. पोट निवडणुकींमध्ये पराभव झाल्यानंतर पुढल्या निवडणुकीमध्ये पराभव होऊ नये म्हणून दर कमी केले,” असं राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “पेट्रोल-डिझेलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर या देशात भारतीय जनता पार्टीचा पराभव करावा लागेल,” असंही राऊत म्हणाले.

भाजपाने केली होती दरकपातीची मागणी…
केंद्र सरकारने तीन नोव्हेंबर रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर पाच रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमधून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्राने केल्याचा प्रचार भाजपाकडून करण्यात आला होता. केंद्र सरकारने इंधन दरात कपात केल्यानंतर राज्यातही महाविकास आघाडी सरकारने दरात कपात करावी, अशी मागणी महाराष्ट्र भाजपाने केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp sanjay raut slams bjp over fuel price criticism by hm amit shah scsg