महाराष्ट्रात सध्या उर्फी जावेदचा विषय चांगलाच गाजतो आहे. काही दिवसांपूर्वी पठाण सिनेमातल्या बेशरम रंग गाण्यातल्या दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीमुळेही वाद झाला होता. उर्फी जावेद तोकडे कपडे घालून मुंबईत फिरते आहे ती पूर्ण कपडे घालेपर्यंत मी शांत बसणार नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. या सगळ्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी रोखठोक या सदरात टीका केली आहे. तसंच उर्फीमुळे भाजपाचंच वस्त्रहरण झालं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
महाराष्ट्राचे राजकारण सध्या पूर्ण रसातळाला गेले आहेत. इतकं की राज्यातले सगळे प्रश्न संपले आहेत. कोण्या एका उर्फी जावेद या नवख्या नटीच्या तोकड्या कपड्यांवरून भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या बोलू आणि डोलू लागल्या आहेत. उर्फी जावेद या कालपर्यंत अनोळखी असलेल्या नटीने मुंबईच्या रस्त्यावर कमी कपड्यात शुटिंग केलं. त्यामुळे हिंदू संस्कृतीचे वस्त्रहरण झाले असे भारतीय जनता पक्षाला वाटते आणि त्यांनी त्या उर्फीविरूद्ध तशी मोहीम सुरू केली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की उर्फीला प्रसिद्धी मिळाली आणि तिचा भाव वधारला. त्यामुळे संस्कृतीचे वस्त्रहरण कुणी केले? तर ते भाजपानेच केलं. उर्फीही भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर तुटून पडली. हे सगळं टाळता आलं असतं. संस्कृतीच्या नावाखाली भाजपा जी फौजदारी करत आहे ती अनावश्यक आहे.
आणखी वाचा – Urfi Javed तुला लागली कोणाची ‘उर्फी’…!
उर्फी प्रकरणातले मॉरल पोलिसिंग भाजपावर उलटले
उर्फी प्रकरणात जे मॉरल पोलिसिंग झाले ते भाजपावर उलटले आहे. उर्फी कोण? ती काय करते? या भानगडीशी सामान्य जनतेला काहीही पडलेले नाही. उर्फीने तोकडे कपडे घातल्याने बलात्कार वाढतील हा दावा हास्यास्पद आहे. महिलांवरचे अत्याचार ही विकृती आहे. ही विकृती कायद्यावरही मात करत असते. महाराष्ट्रातील भाजपा मुंबईत उर्फी प्रकरणावर लढा देत असताना तिकडे देशाच्या राजधानीत म्हणजे दिल्लीत जे घडलं ते धक्कादायक होतं. अंजली सिंह या मुलीला उडवण्यात आलं आणि फरपटत नेलं गेलं त्यामुळे तिचा मृत्यू झाला. असभ्यता आणि क्रूरतेचे टोक गाठणारे कृत्य भाजपाच्याच एका पदाधिकाऱ्याने केले. दिल्ली तल्या कंझावाल भागात जे घडलं ते भयंकर होतं. अंजली स्कुटीवर चालली होती. तिला कारने धडक दिली. त्यात तिचा पाय या कारमध्ये अडकला, तिला १२ किमी फरफटत नेण्यात आलं. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही कार चालवणारा भाजपाचा पदाधिकारी होता. दिल्लीतल्या भयंकर घटनेने संपूर्ण देश हादरला. दिल्लीत जेव्हा निर्भया प्रकरण घडला होतं तेव्हा भाजपाने संसद चालू दिली नाही. आता अंजली प्रकरणात भाजपा शांत आहे. मुंबईत उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून संस्कृती रक्षणाचे धडे देणाऱ्यांनी अंजलीचा आक्रोश ऐकलाच नाही. अनसा अनेक अंजलींनी गेल्या सात वर्षात तडफडून प्राण सोडले.
आणखी वाचा – ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!
अमृता फडणवीस उर्फीच्या बाजूने उभ्या राहिल्या
उर्फीवरून एवढं सगळं सुरू असताना तिच्या बाजूने अमृता फडणवीस उभ्या राहिल्या. ती एक स्त्री आहे ती जे काही करते आहे त्यात वागवं काही नाही असं अमृता फडणवीस म्हणाल्या. थोडक्यात काय कपड्यांत काय आहे? व्यावसायिक गरजेनुसार प्रत्येकजण पोशाख आणि पेहराव करत असतो असं अमृता फडणवीस म्हणाल्या. मात्र संस्कृतीच्या नावाखाली भाजपाच्या सांस्कृतिक रक्षक संघटना येऊ लागल्या आहेत. मात्र त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अंजली सिंहला चिरडून मारलं यावर कुणी ब्र काढायला तयार नाही. हे आक्रित नाही का?
दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर आक्षेप का?
शाहरुख खानच्या पठाण सिनेमातील गाण्यात दीपिका पदुकोणने भगवी बिकिनी घातली आणि रोमान्स केला. हे सगळं संस्कृती विरोधी असल्याचं ठरवून भाजपा आणि इतर संघटनांनी पठाणवर बंदी घालण्याची बहिष्कार मोहीम सुरू केली. हा राग दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर होता की अन्य कशावर? दीपिकाने जेएनयूमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्याच रागातून हे भगव्या बिकिनीचं प्रकरण उभं करण्यात आलं असाही आरोप रोखठोकमध्ये करण्यात आला आहे.