Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकाऱणातले खलनायक आणि कळीचा नारद आहेत अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली. तसंच अनिल देशमुखांना केलेले आरोप योग्यच आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी भाजपावरही जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत? (What Sanjay Raut Said?)
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जो खुलासा केला आहे की ते गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे एक मध्यस्थ पाठवला आणि त्या मध्यस्थाने सांगितलं की तुम्ही तीन प्रतिज्ञापत्रांवर सह्या करा, तसं केल्यास तुम्ही तुरुंगात जाणार नाही तुम्हाला अटक होणार नाही किंवा ईडी सीबीआयची कारवाईही होणार नाही. समित कदम हा सद्गृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने अनिल देशमुख यांना वारंवार भेटला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यावर सांगतोय ते आरोप करा, प्रतिज्ञापत्रांवर सह्या करा असं सांगत होता. अशा धमक्या त्यांना देण्यात आल्या. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले खलनायक आहेत हे माझं स्पष्ट मत आहेत. Sanjay Raut यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मी, अनिल देशमुख राजकीय दबावाला बळी पडलो नाही-राऊत
राजकीय दबावाला मी, अनिल देशमुख असे लोक बळी पडले नाहीत. जे झुकले ते भाजपात गेले. मग ते अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील. अजित पवार, एकनाथ शिंदे वेश पालटून फिरत होते. अनिल देशमुख यांना समित कदम भेटले होते. आता यावर फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल की आमचा काही संबंध नाही. मात्र हा त्यांचा संबंध आहे असं संजय राऊत म्हणाले आणि त्यांनी समित कदम यांचे देवेंद्र फडणवीसांबरोबरचे त्यांचे फोटोही दाखवले. तसंच समित कदम हा संघाशी संबंधित आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही त्या समित कदमला ओळखत नाही, अनिल देशमुख सांगतात ते खोटं आहे असा दावा केला जाईल त्यासाठी आम्ही अनेक पुरावे देऊ शकतो. समित कदम कोण आहे? त्याला वाय दर्जाची सुरक्षा का दिली आहे? या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं. अनिल देशमुख यांच्याबाबत जे झालं आहे ते माझ्याबाबतही झालं आहे. मी व्यंकय्या नायडूंनाही या संदर्भात पत्र लिहिलं होतं. त्यात मला धमक्या कशा येत होत्या ते मी सांगितलं. माझ्याबरोबर जे घडलं तसाच हा प्रकार आहे असं संजय राऊत म्हणाले. आधी समजावलं जातं ऐकलं नाही तर धमक्या दिल्या जातात. अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वेश पालटून फिरत होते हे करायची गरज काय? असा सवालही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी विचारला आहे.
अनिल देशमुख जे सांगत आहेत त्यात काहीही चुकीचं नाही
अनिल देशमुख यांच्या बोलण्यात तथ्य आहे. मला अडीच वर्षापासून हे माहीत आहे. त्यांचा आणि माझा संवाद होता. त्यांनी मला हा विषय सांगितला आहे. त्यांच्या सांगण्यात, बोलण्यात सातत्य आहे. याच अनुभवातून मी पण गेलो आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती. त्यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांची मालमत्ता परत मिळाली. अशोक चव्हाणांचं नाव आदर्श घोटाळ्यात आलं होतं. पक्ष बदलताच घोटाळा स्वच्छ झाला. भावना गवळी विधान परिषदेत आल्या आहेत. या सगळ्या गोष्टी दिसत आहेतच. असंही संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut यांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळला आहे. विरोधकांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवायचं यासाठीच राज्याच्या गृहमंत्रालयाचा वापर होतो आहे. पक्षाचे गुंड, लफंगे, चोर आहेत त्यांना संरक्षण दिलं जातं. फडणवीसांनी ज्यांना संरक्षण दिलं त्यातले ८० टक्के लोक लफंगे आहेत. एकनाथ शिंदे गटात कुणी प्रवेश केला की संरक्षण मिळतं. त्यांनी काय मोठा तीर मारला? भगत सिंग, राजगुरु आहेत का ते? जनता वाऱ्यावर आहे. दरोडे, खून, बलात्कार असं घडतं आहे जनतेची फिकीर नाही. असा आरोप Sanjay Raut यांनी केला आहे.
भाजपाला आता रामाचा विसर पडला आहे
देवेंद्र फडणवीस आणि भाजपा रामाला विसरले आहेत. राम आता त्यांच्या कामाचा राहिला नाही. कदाचित रामाला ते परत गाभाऱ्यात बंद करतील. सध्या जय जगन्नाथची घोषणा आहे. जो देव पावणार तो त्यांचा देव त्यांना म्हसोबाही चालतो कारण ते बेगडी आणि ढोंगी हिंदुत्ववादी लोक आहेत. त्यांचं धर्मावर प्रेम नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आता कारसेवेच्या कथा सांगाव्यात ना. आता राम भाजपाच्या, हिंदुत्वाच्या डिक्शनरीत नाही. पण राम आमचा म्हणजेच जनतेचा आहे, असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.
देवेंद्र फडणवीस खलनायक आणि कळीचा नारद
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले खलनायक आहेत. किती लोकांना त्यांनी खास सुरक्षा दिली आहे ते आम्ही तपासत आहोत. देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्याच्या राजकाणात कळीचा नारद आहेत. महाराष्ट्र कलंकित करण्याचं काम त्यांनी केलं. महाराष्ट्रात त्यांनी विषाचा प्रवाह निर्माण केला. हे राज्य त्यांना माफ करणार नाही. इतिहासात त्यांची नोंद खलनायक, कळीचा नारद अशीच होईल. या राज्याचं भलं करण्याची संधी त्यांना ईश्वराने दिली होती पण त्यांना राज्य पुढे नेता आलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेतील तिरस्करणीय व्यक्ती कुणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी पदाचा, सत्तेचा, हातातल्या यंत्रणेचा गैरवापर लोकशाही संपवण्यासाठी केला आहे असा गंभीर आरोप संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला आहे.