छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी संध्याकाळी महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. राज्यातील सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीची ही पहिली संयुक्त सभा होती. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेतेमंडळीची उपस्थिती होती. या सभेतून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर आणि राज्य सरकारवर परखड शब्दांत टीकास्र सोडल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात बोलतान शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर आणि मविआच्या सभेवर टीका केली.
“फक्त शिव्या देण्याचं काम चालू आहे”
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शिव्या देण्याचं काम होत असल्याचं श्रीकांत शिंदे माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले. “महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, राजकीय स्तर घसरल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंच फक्त शिव्याशाप देण्याचं काम केलं जात आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रानं कधी पाहिली नव्हती”, असं श्रीकांत शिंदे यांनी नमूद केलं.
“९ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात ज्या काही गोष्टी घडल्या, त्यामुळे सत्ताबदल झाला. कधी विचारही केला नव्हता की अशा काही गोष्टी होतील. पण त्यामुळेच आज हा सगळा थयथयाट पाहायला मिळत आहे. रोज कुणाला ना कुणालातरी शिव्या दिल्या जात आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत विकासाचा शब्दही काढला जात नाहीये. पण जे आज मोठमोठ्या सभा करत आहेत त्यांनी गेल्या अडीच वर्षांत नेमकं काय केलं? हे त्या सभेतून आधी सांगायला पाहिजे”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
“नार्को चाचणीची मागणी रास्तच”
दरम्यान, नाशिकमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणातूनही महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. “ज्यांना खोक्यांची सवय आहे, त्यांना खोकेच दिसतात. मध्यंतरी आमदार सुहास कांदे यांनी केलेली नार्को चाचणीची मागणी रास्तच आहे. ही चाचणी झाल्यानंतर कुणाकडे किती खोके आहेत, ते उघड होईल. विरोधक रात्री झोपल्यानंतरही खंजीर आणि खोकेच बोलत असतील. यापूर्वी इतिहासात कधीच नाही इतके आमदार, खासदार व पदाधिकारी त्यांना सोडून गेले. हे सर्व लोक का गेले, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.