Shrikant Shinde On Maharashtra Government Formation : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. त्यामुळे विधानसभेत मिळालेल्या यशानंतर महायुतीकडून राज्यात सरकार स्थापनेच्या दिशेने पावलं टाकण्यात येत आहेत. मात्र, निवडणुकीचा निकाल लागून आज तब्बल आठ दिवस होऊन गेले तरीही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. यातच मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? या पदाबाबत सस्पेंस कायम आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृहखातं मागितल्याची चर्चा आहे. मात्र, गृहखातं देण्यास भाजपाचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. यातच एकनाथ शिंदे हे दोन दिवस साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी गेले होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आता श्रीकांत शिंदे यांनी या सर्व घडामोडींबाबत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट करत प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतल्याचं सागंत उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचं वृत्त फेटाळून लावत माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “…अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू”, राऊतांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांऐवजी…”

श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

“महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र, पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो. परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये, अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा”, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

श्रीकांत शिंदेंच्या नावाच्या चर्चांवर एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंचं नावाची चर्चा आहे? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना काल माध्यमांनी विचारला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले होते की, “अजून चर्चा सुरु आहेत. तुम्हीच (माध्यमात) चर्चा करत असतात. तुमच्या (माध्यमाच्या) चर्चा जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो की या सर्व चर्चा आहेत. आमची अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाली. यानंतर आता आमच्या तिघांमध्ये (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार) एक बैठक होईल. या बैठकीत आमची साधक बाधक चर्चा होईल”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp shrikant shinde on maharashtra deputy chief minister in mahayuti government politics maharashtra government formation gkt