उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. याबाबत आमदार आदित्य ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना कल्याणची जागा मिळविण्यासाठी सोबत असलेल्या पाच जणांचा बळी द्याला लागेल, असा टोला लगावला होता. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला आता श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“ज्याची जी कुवत आहे, त्या प्रमाणे वक्तव्य केले पाहिजेत. आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्य झेपत नसतील तर करू नका”, असे प्रत्युतर श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डोंबिवलीत पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली.

हेही वाचा : “दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला

कल्याण लोकसभेला मताधिक्याचा रेकॉर्ड होईल

श्रीकांत शिंदे म्हणाले, “कल्याण लोकसभा मतदारसंघात आज कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा संपन्न झाला. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. याआधी शिवसेना, आरपीआय, भाजपा अशी युती होती. पण आता त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटही सहभागी आहे. त्यामुळे महायुतीमधील सर्व पक्षाची ताकद आम्हाला मिळाली आहे. भविष्यात या महायुतीच्या माध्यमातून कल्याण लोकसभेला मताधिक्याचा एक वेगळा रेकॉर्ड होईल”, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.

कल्याण लोकसभेबाबत फडणवीस काय म्हणाले?

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांची होती. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपाच्या कार्यकर्त्यांचा विरोध असल्याची चर्चा होती. यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा लवकर होत नसल्याचे बोलले जात होते. अखेर यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधील महायुतीचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील असे शनिवारी सांगितले.