महाविकास आघाडीची वज्रमूठ राहणार की नाही? हे बघावं लागेल असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे नेते इतके दिवस सरकारवर टीका करत होते. आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. हे सरकार कुठल्या विचारांनी नाही तर सत्तेसाठी खुर्चीवर आलं होतं असंही श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे. तसंच अजित पवार यांच्यावरही श्रीकांत शिंदेंनी टीका केली आहे.
अजित पवारांना टोला
आज वज्रमूठ दाखवली जाते आहे ती वज्रमूठ राहते की वज्रझूठ ठरते ते पण बघावं लागेल असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. अजित पवारांची ओळख ही त्यांच्या काकांमुळे आहे. दोन दिवस आधी परिस्थिती पाहिली आहे. अजित पवारांना वाटलं शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर मलाच राष्ट्रीय अध्यक्ष करतील असं अजित पवारांना वाटलं होतं. मात्र काय घडलं ते आपण पाहिलं. त्यामुळे काका मला वाचवा हे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे असाही टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला. अशा लोकांनी मुख्यमंत्र्यांना कोण ओळखतं अशी टीका करु नये असंही श्रीकांत शिंदेंनी सुनावलं आहे.
नाना पटोलेंनाही ऐकवले खडे बोल
“आमचं सरकार अनेक वर्षे टिकणार आहे. त्यामुळे कुणाला काही पर्यायी जॉब हवा असेल तर भविष्य वर्तवण्याचं काम नाना पटोले यांनी करावं” असाही टोला श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
महाराष्ट्रात १० महिन्यांपूर्वी जे सरकार स्थापन झालं त्या धक्क्यातून अद्याप विरोधक सावरलेले नाहीत. त्यामुळे दररोज सकाळी आमच्यावर टीका केली जाते. तसंच पातळी सोडून ही टीका केली जाते आहे. महाराष्ट्राची संस्कृती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घालवली असंही श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकार हे सत्तेसाठी आलेले लोक आहेत. आमचं सरकार चांगलं काम करतं आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
आदित्य ठाकरेंच्या तोंडी काँट्रॅक्टरची भाषा आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले लोक आज ती भाषा बोलत आहेत कारण २५ वर्षे तेच करत आले आहेत असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला आहे.