अनेक नेतेमंडळी बोलण्याच्या ओघात, गडबडीत सर्रास अशा काही चुका करतात ज्यामुळे पुढच्या काळात त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होते. आता शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याला देखील अशाच काहीशा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी बोलता बोलता मुख्यमंत्री म्हणून चक्क काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत याचा एका शिवसेना नेत्यालाच विसर पडला आहे, अशी टीका सध्या राज्यभर होत आहे. राऊत यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवयाही उंचावल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री म्हणून थेट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचं नाव घेतलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, विनायक राऊत यांच्या या विधानानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. विनायक राऊत हे शनिवारी (२ सप्टेंबर) सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यातील आंजिवडे घाटाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, प्रसारमाधम्यांशी बोलताना विनायक राऊत यांनी चक्क महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री असा केला आहे.

बोलण्याच्या ओघात खरंतर अनेक नेते चुकीचे शब्दप्रयोग, चुकीची वाक्य, आक्षेपार्ह उल्लेख आणि विधानं सातत्याने करत असतात. मात्र, विनायक राऊत यांना आपल्याच पक्षप्रमुखाच्या पदाचा विसर पडणं हे थोडं आश्चर्यकारकच असल्याचं म्हटलं जातं. मोठ्या उलथापालथी आणि अनपेक्षित राजकीय घडामोडींनंतर स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असताना विनायक राऊत यांच्यासारख्या बड्या नेत्याला याचा विसर पडल्याने या विधानाची खिल्ली देखील उडवली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp vinayak raut mistakenly said cm ashok chavan instead of uddhav thackeray gst