शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नवी मुंबई पोलिसांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच शिवसैनिक कधीच पोलिसांच्या संरक्षणात चालत नाही आणि वाढत नाही असं मत व्यक्त केलं. ते नवी मुंबईत बुधवारी (१९ ऑक्टोबर) शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तडीपार मोर्चात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनायक राऊत म्हणाले, “खासदार राजन विचारे यांचं संरक्षण काढलं. भास्कर जाधव यांनी टीका केल्यावर त्यांचंही मध्यरात्री संरक्षण काढलं. शिवसैनिक कधीच पोलिसांच्या संरक्षणात चालत नाही आणि वाढत नाही. आम्ही रजनी पटेलला जागा दाखवली, तुम्ही मिंधे सरकारचे गोडवे गाऊ नका. तुम्ही कायद्याचे रक्षणकर्ते आहात.”

“…तर ही शिवसेना कदापि गप्प बसणार नाही”

“जे कायदे बनवले ते कायदे मोडले जाऊ नये याची दक्षता पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. एखाद्या शासनकर्त्याने आदेश दिल्यावर आदेशाचं पालन जरूर करा, पण ते करताना कोणावर अन्याय आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तर ही शिवसेना कदापि गप्प बसणार नाही,” असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.

“१०० केसेस असलेला मुख्यमंत्री बनतो आणि आमचा नेता तडीपार”

राऊत पुढे म्हणाले, “१५ वर्षांपूर्वीच्या केसेस काढून इथला डीसीपी पत्रकारांना माहिती देत होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत सांगितलं की माझ्यावर १०० केसेस आहेत. १०० केसेस असलेला मुख्यमंत्री बनतो आणि ज्याला एकही नोटीस नाही तो आमचा नेता तडीपार होतो.”

“मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न केला, तर…”

“तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न केला, तर या महाराष्ट्रात तुम्ही एकटे रामशास्त्री बाण्याचे अधिकारी नाहीत. तुम्हाला कायदा कळत असेल, तर थोडाफार कायदा आम्हालाही कळतो. पोलिसांच्या नोटीस आमच्या पाचवीलाच पुजल्या आहेत. पोलीस कारवाई शिवसैनिकांच्या पाचवीला पुजली आहे. त्यामुळे आम्ही घाबरून जाणार नाही,” असं विनायक राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा : तुमच्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये नाराजी आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत…”

“ठाण्याच्या सभेत एकाला कार्टं म्हटलं म्हणून मला नोटीस”

“मी ठाण्याच्या सभेत एकाला कार्टं म्हटलं म्हणून मला नोटीस आली. आता कार्टं ते कार्टंच. कार्ट्याला कार्टं म्हटलं म्हणून १५३ (अ)ची नोटीस दिली. काय मुर्खाचा बाजार आहे,” असं म्हणत राऊतांनी पोलिसांच्या नोटीसवर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp vinayak raut serious allegations on navi mumbai police cm eknath shinde pbs