“महाराष्ट्रात ८५ टक्के साक्षरता आहे, पण मातोश्रीत साक्षरता नाही. अडीच वर्षांत किती उद्योग महाराष्ट्रातून बाहेर गेले. दरवर्षी अनेक प्रस्ताव येतात पण परवडणाऱ्या उद्योगांनाच सवलती आणि जमिनी दिल्या जातात हे उद्धव ठाकरेंनी माहिती नाही. मी पुराव्यासह बोलतो. तुम्ही माझे मुद्दे खोडून दाखवा,” असे आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना दिलं होतं.
“उद्धव ठाकरेंचा आणि आंदोलनाचा काही संबंध नाही. ते आले आणि भाग घेतला असे कधीच झाले नाही. शिवसेनेच्या छप्पन वर्षांत उद्धव ठाकरे शिवसैनिकांसाठी रस्त्यावर उतरले नाही. मुख्यमंत्री असताना करोना काळात ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसले होते. आता अपयशाचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारू नका,” अशी टीकाही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली होती.
नारायण राणेंच्या टीकेला आता खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “माझं नारायण राणेंना आव्हान आहे, एक मिनिटात एमएसएमईचा फुलफॉर्म त्यांनी सांगावा. मग तुमच्या साक्षरतेची प्रचेती सर्वांना येईल. पंतप्रधान मोदींनी एवढं मोठं खातं दिलं, त्याचं नाव ज्या मंत्र्यांला माहिती नाही, त्यांनी फुशारक्या मारू नये,” असा टोला विनायक राऊतांनी राणेंना मारला आहे.
महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत. त्यावरून विनायक राऊतांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “मिंधे सरकार रडीचा डाव खेळत आहे. निवडणुकांना सामोरे जाण्याची त्यांच्यात हिंमत नाही. आता निवडणुका पार पडल्या तर शिंदे आणि भाजपा सरकारचा सुफडासाफ होणार आहे. तसेच, शिवसेना ( ठाकरे ) आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष बहुमताने निवडून येतील, असा गुप्तचर संस्थेचा अहवाल आहे. त्यामुळे ते निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत,” असेही विनायक राऊतांनी सांगितलं आहे.