केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही गोठवण्याचा हंगामी निर्णय शनिवारी दिला. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीसाठी हा निर्णय लागू असेल, असे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. यावरती आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी ( ८ ऑक्टोंबर ) दुपारी १ वाजता ८०० पानांचे दस्तऐवज सादर केले होते. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे कायम राहणार की, ते गोठवलं जाणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. पण, निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री चिन्ह आणि नावाबाबत महत्वपूर्ण हंगामी निर्णय दिला.
मात्र, ‘शिवसेना’ हे नाव वापरता येणार की नाही? यावर नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही पक्षांना ‘धनुष्यबाणा’ऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेता येईल. तसेच, शिवसेना नावही वापरता येणार आहे. परंतु, त्याला काहीतरी समोर नाव जोडावे लागेल. चुकीची माहिती देऊ नये,” असे ट्वीट नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.
हेही वाचा – ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण…शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास
तातडीच्या निर्णयाला शिवसेनेचा विरोध?
अंधेरी-पूर्वी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढणार आहे. त्याला पक्ष चिन्ह वापरू देण्याचा अधिकार कार्यप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनाच आहे. या पोटनिवडणुकीत शिंदे गटाकडून उमेदवार उभा केला जाणार नसेल तर निवडणूक आयोगाने चिन्हावर तातडीने निर्णय घेण्याची गरज नाही. परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवून चिन्ह गोठवले जाऊ नये, असा दावा शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केला होता.