Shivsena : संजय राऊत हे पक्षाचे विचार आणि भूमिका मांडत नाहीत. ते फक्त स्वतःचे विचार मांडतात. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची विश्वसनीयता खालावली आहे. उद्धव ठाकरेंभोवती चाटूकारांची फौज निर्माण झाली आहे असं म्हणत पक्षाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. काही दिवसांपूर्वीच किशोर तिवारींची पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले किशोर तिवारी?

“संजय राऊत नागपूरला आले आणि त्यांनी स्वबळाची भाषा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पक्षाला गळती लागली. आदित्य ठाकरेंचे विश्वासू दुष्यंत चतुर्वेदी यांनी पक्ष सोडला. राजन साळवी पक्ष सोडून गेले तरीही कुणाला जाग आलेली नाही. ज्याला जायचं आहे त्याने जा, कुणाच्याही जाण्याने फरक पडत नाही ही पक्षाची भूमिका आत्मघातकी आहे.” असं मत किशोर तिवारींनी मांडलं आहे.

संजय राऊतसारखी माणसं लबाड-तिवारी

संजय राऊत सारखी माणसं लबाड आहेत. त्यांच्यामुळे पक्षाची विश्वसनीयता हरवली, पत हरवली. ते काहीही बोलत असतात. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला. यांची अपेक्षा होती की एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणा, खंडणीखोर म्हणा. शरद पवार असं कसं काय म्हणतील? ते चांगलंच बोलणार ना? संजय राऊत काही पक्षाची भूमिका मांडत नाहीत ते स्वतःचे विचार मांडतात. पक्षाला आर्थिक कार्यक्रम नाही, दि दिशा नाही. तसं असतं तर लोक सोडून गेले नसते. हे लोक सनातन धर्माला शिव्या देत आहे. कट्टर हिंदुत्वाचा शिवसेनेचा अजेंडा होता. यावर आमचे लोक काही बोलत नाहीत. काँग्रेसच्या हिंदूविरोधी वक्तव्यांवर तुम्ही बोलू नका असं मला सांगण्यात आलं नव्हतं. आपल्याला बांगलादेशींनी निवडून आणलं त्यांची मतं मिळणार नाही असं मला सांगण्यात आलं होतं.

महाविकास आघाडी नसती तर यंदा एकही सीट आली नसती-तिवारी

महाविकास आघाडी नसती तर एकही आमदार निवडून आला नसता. महाकुंभमेळ्यावर हे लोक बोलत आहेत. सनातन धर्म, हिंदुत्व ही लाईन आम्ही घेऊन चाललो होतो. पण आता काय होतं आहे? अजमेरला चादर पाठवली जाते. संजय राऊतला नागपूरला येऊन स्वबळाची भाषा केल्यानंतर इथले नागपूरमधले लोक निघून गेले. पराभव झाल्यानंतरही माज कमी झालेला नाही. सध्याच्या घडीला कशाचा काही ताळमेळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाही. जेव्हा सगळे खासदार सोडून चालले होते तेव्हा मी संपर्क केला होता असं किशोर तिवारी यांनी सांगितलं. काही वेळापूर्वीच किशोर तिवारी यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आरोप केले. आमचे जे आमदार आणि खासदार निवडून आले त्यांना कुणी पैसेही दिले नाहीत, निधी दिले नाहीत. भाजपा समोर तुम्ही टिकू शकत नाही अशी स्थिती आहे. संघटनेच्या प्रमुखांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. अनेक घोडचुका करण्यात आल्या आहेत असंही किशोर तिवारी यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी चाटुकारांची फौज निर्माण केली-तिवारी

विधानसभेत आता आपलीच सत्ता येणार हा अतिआत्मविश्वास शिवसेनेला नडला. उद्धव ठाकरेंनी मला पक्षातून काढलं तरीही मी उद्धव ठाकरेंबरोबर राहणार. मी काही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार नाही. मी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी दहावेळा गेलो होतो. पण भेट दिली गेली नाही. मला एकदाच म्हणाले की तुमच्याशी शांतपणे बोलायचं आहे. माझ्याशी कधीही संवाद साधला नाही. नवीन माणसाशी हे लोक बोलतात. कार्यकर्त्यांशी संपर्क न ठेवणारे लोक संपर्क साधायला येतात. उद्धव ठाकरेंना सांगतात की हे असं बोलतात तसं बोलतात. प्रियांका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी कशी काय दिली? त्यांनी शिवसेनेसाठी काय केलं? लबाड लोक जमा करुन, चाटुकारांची फौज तयार करुन उद्धव ठाकरे पक्षाचं पुनरुज्जीवन करु पाहात असतील आणि या चाटुकारांना आम्ही बोलल्यावर जर आम्हाला पदमुक्त करत असतील तर मी काय बोलणार? असाही सवाल किशोर तिवारींनी केला आहे.

Story img Loader