शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये उभारण्याचा वाद सध्या चिघळला असतानाच शिवसेनेने हा वाद सामोपचाराने मिटावा, अशी अपेक्षा विधानसभेत सोमवारी व्यक्त केली.
माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर आदींच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत मांडला. त्यावर सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या जागेवरील चबुतरा हटविण्यावरून सध्या सरकार आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. या वादाचा मुद्दा शोकप्रस्तावावरील चर्चेत उपस्थित झाला. बाळासाहेब सर्वासाठीच आदराचे असून त्यांचे स्मारक कोठे व्हावे याचा निणर्य शिवेसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे घेतील. मात्र सध्या शिवाजी पार्कवर निर्माण झालेला वाद सामोपचाराने मिटावा. त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन आमच्या नेत्यांशी चर्चा करून या वादावर तोडगा काढावा, अशी सूचना शिवसेनेचे एकनाथ शिंदे, विनोद घोसाळकर, रवींद्र वायकर आदी सदस्यांनी केली.
वायकर यांनी तर नवी मुंबईत नव्याने होत असलेल्या विमानतळास बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केली. तर मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी विधिमंडळात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली. तसेच १७ नोव्हेंबर हा दिवस बाळासाहेबांची पुण्यतिथी म्हणून सरकारने घोषित करवा अशी मागणीही त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा