शिवसेनेसाठी राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या नामांतरांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या नामांतरांचा मुस्लिम समाजानाने अयोध्येच्या निर्णयाप्रमाणे स्वीकार करावा अशी इच्छा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. या दोन शहांबरोबरच नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून, या निर्णयांद्वारे शिवसेनेने हिंदुत्ववादी आणि आगरी-कोळी समाजातील मतपेढी जपण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे यामागील राजकीय हेतूबद्दल चर्चा होत असताना शिवसेनेनं हा निर्णय भूमिपुत्रांच्या भावनांचा आदर करण्यासाठी घेण्यात आल्याचं ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलंय. इम्तियाज जलील, अबू आझमी यासारख्या नेत्यांकडून या नामकरणाला विरोध होत असतानाच शिवसेनेनं या निर्णयामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अनेकांच्या पोटात गोळा उठला
“महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट असतानाच ‘ठाकरे सरकार’ने बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. लोकभावनेशी संबंधित असे हे निर्णय आहेत. नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय झाला. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वचनपूर्ती केली. ‘औरंगाबाद’चे संभाजीनगर करण्याबाबत अनेकांच्या पोटात गोळा उठला तरी त्याची पर्वा न करता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
महाराष्ट्र हा फक्त शिवरायांच्या विचारांचा
“अयोध्येत बाबराचे नामोनिशाण शिवसैनिकांनी कायमचे नष्ट केले तसे औरंगाबादचे नाव महाराष्ट्रातून पुसून टाकले. याचा सार्थ अभिमान महाराष्ट्रातील मुसलमान बांधवांनी बाळगायलाच हवा. जसा बाबर आपला कोणी लागत नव्हता, तसा औरंगजेबही आपल्या नात्यागोत्याचा व रक्ताचा नव्हता. तो छत्रपती संभाजीराजांचा मारेकरी होता व शिवरायांनी त्याच्या मोगली सत्तेविरुद्ध मोठा लढा दिला. औरंगजेबाचे नाव महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यास असणे हे अत्यंत क्लेशदायक होतेच, पण स्वाभिमानास ठेच लावणारे होते. काही लोक अलीकडच्या काळात औरंगजेबाच्या कबरीवर नमाज वगैरे अदा करण्यासाठी मुद्दाम येऊ लागल्याने हे थडगे जरा जास्तच चर्चेत आले, पण महाराष्ट्र हा फक्त शिवरायांच्या विचारांचा व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला मानणारा आहे,” असा टोला शिवसेनेनं थेट कोणाचाही उल्लेख न करता करता लागवला आहे.
फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना त्यांनी…
“‘अयोध्या’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ज्या नम्रतेने देशभरातील मुसलमान समाजाने स्वीकारला तीच भूमिका संभाजीनगरबाबत ठेवायला हवी. ‘ठाकरे’ सरकार औरंगाबादचे संभाजीनगर करायला का घाबरते, असले सवाल मधल्या काळात राज्यातील विरोधी पक्षाने केले. खरे तर फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना त्यांनी हे पुण्यकर्म का केले नाही, या प्रश्नाचे उत्तर आधी द्यायला हवे,” असा खोचक टोला शिवसेनेनं लगावलाय.
हा निर्णय त्या सर्व वीरांसाठी मानवंदनाच ठरेल
“संभाजीनगरमधील पाण्याचा प्रश्न असो की नामांतराचा, सर्व प्रश्नांवर ठाकरे सरकारने तोडगा काढला. शेवटी अनेकदा लोकभावनेचाच आदर करून निर्णय घ्यावा लागतो. उस्मानाबादचे ‘धाराशीव’ असे नामांतरही बरेच दिवस लटकून पडले होते. याबाबतही शिवसेनेचा शब्द होता. मराठवाडा हा औरंगजेबाप्रमाणे निजामाच्या टाचांखाली भरडलेला प्रदेश आहे. एका मोठ्या संघर्षातून मराठवाडा निर्माण झाला. औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव करणे ही मराठवाड्यातील मुक्तिसंग्रामात ज्यांनी हौतात्म्य पत्करले, त्याग केला त्या सर्व वीरांसाठी मानवंदनाच ठरेल,” असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केलाय.
उद्धव ठाकरेंचे निरोपाचे भाषण इथे पाहा –
भूमिपुत्रांच्या मनात शिवसेनाप्रमुखांविषयी अपार श्रद्धा आहेच, तरीही…
“हा निर्णय दोन्ही बाजूंनी विनयाने स्वीकारावा, तरच हिंदुत्वाची बूज राहील व राष्ट्रभक्तीचा कस लागेल. माथी भडकवण्याचे उद्योग याप्रश्नी होतील, पण शेवटी औरंगाबादचे संभाजीनगर करणे हा निर्णय शिवरायांच्या महाराष्ट्राने केलाय व ही तर श्रींची म्हणजे हिंदुहृदयसम्राटांची इच्छा होती. जसे औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव झाले व देशभरातील प्रखर धर्माभिमानी जनतेची इच्छा ठाकरे सरकारने पूर्ण केली त्याच पद्धतीने नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्तावदेखील मंजूर केला. कष्टकऱ्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या, त्यांच्यासाठी लढा देणाऱ्या लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास द्यावे यासाठी नवी मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांतील लोकांनी एक कृती समिती तयार केली. त्या माध्यमातून त्यांनी मोहीम राबवली. या विमानतळास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचे की दि. बा. पाटलांचे, असा वाद निर्माण झाला. आगरी कोळी व इतर सर्व भूमिपुत्रांच्या मनात शिवसेनाप्रमुखांविषयी अपार श्रद्धा आहेच. तरीही स्थानिकांचे पुढारी म्हणून ‘दि.बां.’चे नाव देण्याचा आग्रह उद्धव ठाकरे यांनी मान्य केला,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
विरोधकांकडे आता बोलायला काय राहिले?
“दि.बा. हे फक्त रायगड-ठाणे जिल्हय़ातील किंवा नवी मुंबईतील एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते. आजच्या नवी मुंबई उभारणीत व त्या कामी आपला जमीनजुमला, शेती गमावलेल्या लोकांना न्याय मिळावा यासाठी ते लढत राहिले. शिवसेनाप्रमुखांशी त्यांचा स्नेह होताच. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळास ‘दि.बां.’चे नाव देऊन उद्धव ठाकरे यांनी भूमिपुत्रांच्या लढय़ाचाच गौरव केला. शिवसेना ही भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झाली. शिवरायांच्या विचारांचा भगवा तिने जगात फडकवला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानास तिने नख लागू दिले नाही, लोकभावनेचा आदर शिवसेनेने सदैव केला. संभाजीनगर, धाराशीव व ‘दि.बां.’च्या निर्णयाने महाराष्ट्रातील अस्मितेला तेज प्राप्त झाले व ठाकरे सरकार उजळून निघाले. विरोधकांकडे आता बोलायला काय राहिले?,” असा प्रश्न लेखाच्या शेवटी विचारण्यात आलाय.