एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निर्णय दिला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना ( ठाकरे गट ) सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. पण, खरी शिवसेना कोणाची यावरून भाजपा आमदार आशिष शेलार आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात विधानसभेत जुंपल्याचं पाहायला मिळालं.
“उबाठा शिवसेना वगैरे काही नाही. शिवसेना एकच आहे,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं. याला प्रत्युत्तर देताना शिवसेना आमच्याकडेच असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला.
आशिष शेलार म्हणाले, “विधानसभेत उबाठा शिवसेना अशा पक्षाने काही नोंदणी केली आहे का? कारण, निवडणूक आयोगाने शिवसेना एकच असल्याचं सांगितलं आहे. मग, उबाठा शिवसेना कुठे आहे? उबाठा शिवसेना पक्षाची नोंदणी केली का? त्यांना मान्यता दिली का? गटनेता, प्रतोद आणि प्रतिनिधित्व ठरवलं आहे का? उबाठा शिवसेना अदृष्य आहे.”
हेही वाचा : “विधानसभेत उबाठा शिवसेना अशा पक्षाने काही नोंदणी केली आहे का? कारण…”, असेही आशिष शेलार यांनी म्हटलं.
“उबाठा शिवसेना वगैरे काही नाही. शिवसेना एकच आहेत, ती तुमच्यासमोर निर्णयासाठी आली आहे. दुसरी कोणती शिवसेनाच नाही आहे. त्यामुळे समान संधी आणि समान न्यायावर निर्णय घ्यावा,” असे आवाहन आशिष शेलार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केलं.
यावर भास्कर जाधव चांगलेच संतापले. “निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला, त्याचा सभागृहाशी काही संबंध नाही. सर्वोच्च न्यायालयाने मुख्य प्रतोद सुनील प्रभू असून भरत गोगावले नसल्याचं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग आणि आशिष शेलार मोठे नाहीत. मूळ शिवसेना ही आमच्याकडेच आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर जे चाललं आहे, ते लोकशाही संपवण्याचं काम आहे,” अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी सुनावलं आहे.