राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज धुळे दौऱ्यावर आला होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध प्रश्नांना उत्तरं दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना ईडी सारख्या यंत्रणेचा कशा पद्धतीने गैरवापर केला जातो, याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, अनिल देशमुख यांची जवळपास १०९ वेळा ईडीकडून चौकशी करण्यात आली. मग १०८ वेळा यंत्रणेला तपासात काहीच मिळालं नाही का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी यावेळी विचारला. तसेच ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय पक्षांकडून चालवायच्या नसतात, सरकारमधील प्रशासनाकडून चालवायच्या असतात, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी अमृत योजना आणि स्मार्ट सिटी योजना या दोन्ही योजना सक्षम फेल झाल्याचाही दावा केला. त्या धुळे येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं की, “मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता येणार असून तेथे शिवसेनेचाच महापौर निवडून येईल. करोना संसर्गाच्या काळात ज्याप्रकारे मुंबई महानगरपालिकेनं काम केलं आहे. ते पाहता मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता येणार आहे, असं भाकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
या दौऱ्यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसंघर्ष मोर्चातर्फे आयोजित खान्देशस्तरीय विचार संवाद सभेला देखील उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातील समृद्ध, संस्कृतीचा मोठा वारसा असणाऱ्या खान्देशात शिक्षण, आरोग्य, पाणी, रोजगार, वनसंवर्धन अशा अनेक समस्या आहेत. मानवी विकास निर्देशांकात हे जिल्हे अति मागासलेले आहेत. आदिवासी बहुल व ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने विकास अपेक्षित आहे. परंतु जोपर्यंत या विकास आराखड्याला योग्य दिशा, आर्थिक पाठबळ, आणि कृतीची जोड मिळत नाही, तोपर्यंत येथील विकास शक्य नाही.
आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून त्यांचं स्थलांतर थांबवू आणि समाजातील प्रत्येक घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहू. त्यासाठी सत्तेत असेपर्यंत त्याचा पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न करू असंही त्यांनी यावेळी म्हटलं.