उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतील मराठा नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. मला आणि माझ्या मुलाला संपवण्याचा कटही त्यांनी आखला होता असा गंभीर आरोप शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी केला आहे. शरद पवारांच्या मांडीवर बसून पक्ष चालवणाऱ्यांना पक्षप्रमुख का म्हणायचं? अशी विचारणा त्यांनी केली आहे. पालापोचाळा कोणाचा झाला आहे याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं असा सल्लाही त्यांनी टीव्ही ९ शी बोलताना दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“उद्धव ठाकरेंना मराठा समाजातील लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही, त्यांना संपवायचं आहे असा मला संशय आहे. नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ शिंदे कोणीही असो, मराठा नेतृत्वाला मोठं होऊ द्यायचं नाही अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का? असा प्रश्न मला पडला आहे,” असं रामदास कदम म्हणाले.

“….तेव्हा मी पुढच्या सीटवर बसायचो हे लक्षात ठेवा,” रामदास कदमांनी राणेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना करुन दिली आठवण, २२ मोठी विधानं

“उदय सामंत यांनी सांगितलं ते जास्त भयानक आहे. उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना कदम कुटुंबाला संपवून टाकण्यासाठी सहा बैठका झाल्या. या बैठकीला सुभाष देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित होते,” असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. “रुग्णालयात असतानाही आमच्याविरोधात कटकारस्थान करुन संपवायला निघाला असाल, तर तुम्ही आम्हाला नाही शिवसेनेला संपवत आहात,” असंही ते म्हणाले.

“तुम्ही कसली हकालपट्टी करता, मीच तुम्हाला…,” रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जाहीर टीका; खदखद मांडताना अश्रू अनावर

“तुम्ही रामदास कदम, योगेश कदमला नाही तर कोकणातील शिवसेनेला संपवत आहात. योगेश कदमला पाडून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा. मग तुमची आई कोण आहे, राष्ट्रवादी की शिवसेना?,” अशी विचारणाही रामदास कदम यांनी केली.

“उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणणार नाही”

“मी त्यांना पक्षप्रमुख म्हणणार नाही, माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन. शरद पवारांऐवजी बाळासाहेबांच्या विचारांचा नेतृत्व ठेवलं असतं तर मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हटलं असतं. पण आज ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम करत नाहीत. तर शरद पवारांच्या मांडीवर बसून, त्यांच्या विचारांशी सहमत होऊन काम करत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी, बेईमानी, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे,” असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

“आमदार, खासदार, नगरसेवक का जातात याचं आत्मपरीक्षण करा. शिवसैनिकांना भावनात्मक पद्दतीने ब्लॅकमेल करायचं काम सुरु आहे. तीन वर्षात आमदारांना भेटले असते तर ही वेळ आली नसती,” अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

“आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना?”

“तुम्ही आजारी होतात, पण आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना? आदित्य ठाकरेंना आपलं सोडून इतरांची खाती सांभाळायची आहेत. त्यांना आमदारांना, खासदारांना भेटायचं नाही. आता तुमच्या यात्रा निघत आहेत, मातोश्री व शिवसेनेचे दरवाजे उघडले असून सर्वांना भेटत आहात. हेच जर तीन वर्ष केलं असतं तर ही वेळ आली नसती,” असंही ते म्हणाले.

“मुलाखत पाहिली तर उंदराला मांजर साक्ष अशीच होती”

“मुलाखत पाहिली तर उंदराला मांजर साक्ष अशीच होती. बाळासाहेबांची शिवसेना आई होती, तर मग त्यांच्या विचारांसोबत गद्दारी कोणी केली तेदेखील सांगा. नवीन शिवसैनिक तुमच्या भावनात्मक गोष्टींमध्ये अडकतील, पण जुन्या शिवसैनिकांनी अनुभव घेतला आहे. अनेक शिवसैनिक वारले, देशोधडीला लागले, संसार उद्ध्वस्त झाले त्यानंतर ही शिवसेना उभी राहिली. तुमच्या आदित्यचं योगदान काय? ते आमदार, खासदारांना पाहतदेखील नाहीत. मी प्लास्टिकबंदी केली आणि आपणच केली असं ते सभागृहात सांगत होते,” असा आरोप रामदास कदम यांनी केला.

“संजय राऊत नेमके कुणाचे आहेत?”

“संजय राऊत नेमके कुणाचे आहेत? ते शिवसेना एकत्र ठेवू शकतील का? पण उद्धव ठाकरेंना त्यातून बाहेर पडायचं नाही. आता ५० लाख स्टॅम्प पेपर जमवा. सगळ्यांकडून मी पाठीशी उभा आहे लिहून घ्या,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena ramdas kadam allegations on uddhav thackeray sgy