महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून रस्सीखेच चालू आहे. जागावाटपाबाबत ज्या बातम्या आणि आकडेवारी (जागावाटपासंदर्भातील वेगवेगळे फॉर्म्युले) समोर येत आहेत त्यावरून शिवसनेच्या गोटात संतापाचं वातावरण असल्याचं दिसत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनीदेखील भाजपावरील त्यांचा संताप व्यक्त केला आहे. अशातच, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला हेतूपुरस्सर त्रास दिला जातोय, असा आरोप शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी केला आहे. कदम म्हणाले, भाजपाने केसाने गळा कापू नये, अन्यथा माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवावं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदास कदम म्हणाले, महाराष्ट्र भाजपा जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे. त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, त्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. परंतु, जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. असं केल्यास भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, याचं भान त्यांनी ठेवायला हवं. आपल्यातील संबंधांबाबत लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये याचं भान भाजपाच्या काही लोकांना असणं आवश्यक आहे.

शिंदे गटातील नेते म्हणाले, २००९ मध्ये आमची (संयुक्त शिवसेना) आणि भाजपाची युती असूनही भाजपाने मला गुहागरच्या विधानसभा निवडणुकीत पाडलं हे वास्तव आहे. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. स्थानिक आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून त्यांच्याच मतदारसंघात विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनं केली जात आहेत. स्थानिक आमदाराला त्रास देतायत, हे सगळं हेतूपुरस्पर चाललं आहे. असं असेल तर भविष्यात भाजपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याची भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे.

हे ही वाचा >> “नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देश २०२६ ला कर्जात बुडेल, कारण…”; प्रकाश आंबेडकर यांची टीका

रामदास कदम म्हणाले, आम्ही (शिंदे गट) मोदी आणि शाहांकडे बघून इथे (एनडीए) आलो आहोत. मागील निवडणुकीत काय झालं याची मला माहिती नाही. परंतु, पुन्हा एकदा आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena ramdas kadam angry on bjp lok sabha seat sharing ravindra chavan interference asc
Show comments