शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम आक्रमक झाले असून उद्धव ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. एबीपी माझाशी बोलताना रामदास कदम यांनी आपण उद्यापासून एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याचंही जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी आजुबाजूला अनिल परब यांच्यासारखे जे लोक बसले आहेत त्यांच्या पार्श्वभागावर लाथ घालून हाकलून द्यावं असा सल्लाही दिला आहे.
“मी उद्यापासून एकनाथ शिंदेंसोबत जाणार, सभा, बैठका घेणार पण कोणालाही मातोश्रीवर बोलू देणार नाही, उद्धव ठाकरेंवर टीका करु देणार नाही. जे शरद पवार, अजित पवार यांना हवं आहे ते होऊ देणार नाही,” असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आजुबाजूला अनिल परब यांच्यासारखे जे लोक बसले आहेत त्यांच्या पार्श्वभागावर लाथ घालून हाकलून द्यावं. शिवसेना पूर्ण संपण्याची वाट पाहू नका असा सल्लाही त्यांनी दिला.
“मातोश्रीवर बसून हकालपट्टी करणं एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का?”
“उद्धव ठाकरे अशी किती लोकांची हकालपट्टी करणार आहेत. ५० आमदारांची हकालपट्टी केली आहे, आता १२ खासदार जाणार त्यांची हकालपट्टी तुम्ही करणार आहात. शिवाजीराव अढळराव पाटील, आनंद अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक जात आहेत त्यांची हकालपट्टी करणार आहात. मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का?,” अशी विचारणा रामदास कदम यांनी केली आहे. हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचं आत्मचिंतन करा असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.
“…तेव्हा मीच संघर्ष केला”
“मी गेल्या ५२ वर्षांपासून शिवसेनेसाठी संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक यासाठी साक्षीदार आहे. दंगली झाल्या तेव्हा तिथे मी पोहोचलो होतो. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे फुटले तेव्हा मीच संघर्ष केला. नारायण राणे गेले तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीमधून बाहेर पडल्यानंतर पुढच्या सीटवर मी बसलेलो असायचो याची आठवण ठेवा. हकालपट्टी तुम्ही केली नाही, तर मी तुम्हाला माझ्या मनातून काढलं आणि आधी राजीनामा फेकला,” असं रामदास कदम म्हणाले आहेत.
“शरद पवारांनी शेवटी डाव साधला, आमची शिवसेना…”, पक्षफुटीवर बोलताना रामदास कदम यांचा गंभीर आरोप!
“…शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते”
“५२ वर्ष काम करणाऱ्या एका शिवसैनिकावर राजीनामा देण्याची वेळ का येते याचं आत्मपरीक्षण करा. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ५१ आमदारांनी शिवसेना वाचवली असल्याने मी त्यांचे आभार मानतो. मी त्यांना टाहो फोडून अजित पवार रोज सकाळी ७ वाजता मंत्रालयात जातात, १०० आमदार कसे निवडून आणायचे याचं टार्गेट त्यांनी ठेवलं आहे आणि जिथे शिवसेनेचे आमदार आहेत तिथे आपल्याला उमेदवाराला ताकद देत शिवसेनेला संपवण्याचं कटकारस्थान केलं असल्याचं सांगत होतो. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी निर्णय घेतला नसता, तर पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते,” असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
“शरद पवार अखेर शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले”
“उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नव्हती, करोना होता हे मान्य. पण शरद पवार कोकणात पक्ष कसा फोडत आहेत याचे फोटो मी तुम्हाला पाठवले होते. शिवसेनेतून कुणबी समाजाला फोडून त्यांना पदं द्यायची, पाच कोटी दिले. तुम्ही मुख्यमंत्री असतानाही शरद पवार शिवसेना फोडत आहेत. सगळे आमदार सांगत असतानाही तुम्ही शरद पवारांना सोडत नव्हता. ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष करुन हिंदुत्व उभं केलं, ते आज जिवंत असते तर यांच्यासोबत युती करत हे पाप करुन दिलं असतं का?,” अशी विचारणा रामदास कदम यांनी केली आहे.
“शरद पवार अखेर शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले, त्यांचा डाव यशस्वी झाला. शरद पवारांना बाळासाहेब असताना जे जमलं नाही, ते त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन केलं,” असंही ते म्हणाले. अडीच वर्षात हे घडलं म्हणून नशीब, अन्यथा पाच वर्षात संपूर्ण शिवसेना संपली असती असंही रामदास कदम यांनी सांगितलं.
“आदित्य ठाकरेंनी वयाचं भान ठेवावं”
“हकालपट्टी करण्यापेक्षा भविष्यात एकत्र कसा येता येईल यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले पाहिजे. गुवाहाटीत जाऊन मी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत तयार केलं होतं. पण येथे आजुबाजूला असलेले नेते बैल, कुत्रे, रेडे आणि महिला आमदारांना वेश्या म्हणू लागले. हा काय बिहार आहे का?,” असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला. “आदित्य ठाकरेंचं वय काय आणि आमदारांना काय बोलतायत याचं भान ठेवा,” असंही त्यांनी सुनावलं.