एरंडोल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या फलकावरील शिंदे गटात सामील आमदार चिमणराव पाटील आणि त्यांचे पुत्र पारोळा येथील बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील यांची छायाचित्रे कोणीतरी कापून टाकल्याचे उघडकीस आले आहे.
राज्यभरात एकीकडे शिवसेनेत फूट पडल्याने स्थानिक पदाधिकारी संभ्रमात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हार्दिक शुभेच्छा देण्याबाबतचे फलक एरंडोल शहरात ठिकठिकाणी मोक्याच्या जागांवर मंगळवारी लावण्यात आले होते. शहरातील पंचायत समिती, मरिमाता चौक, म्हसावद नाका, हिंगलाज कॉलनी, नथ्थू बापू आदी भागांत समर्थकांनी फलक लावले होते. मात्र, शुक्रवारी (८ जुलै) आमदार चिमणराव पाटील आणि त्यांचे पुत्र अमोल चिमणराव पाटील यांची छायाचित्रे असलेला फलकांवरील भाग फाडण्यात आला. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर थोड्या वेळानंतर हे फलक काढून टाकण्यात आले आहेत.
राज्याप्रमाणेच जिल्हा शिवसेनेतही उभी फूट पडण्याचे चिन्ह असले, तरी अनेक ठिकाणी अंतर्गत कलह असल्याने याच वादातून आमदार पाटील व त्यांच्या पुत्राच्या शुभेच्छांचे फलक फाडण्यात आल्याचे मानले जात आहे.
आमदार पाटील हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे एरंडोल येथे त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी मोठा आक्रोश मोर्चा काढला होता. यात शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते. एरंडोल शहरासह तालुक्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध दिसून आला. याबाबत पोलीस ठाण्यात कुठलीच नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.