मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. एकंदरीत अशी स्थिती असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही अद्याप शिवसेना सोडलेली नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच आहे, असं विधान त्यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना गुलाबराव पाटलांनी हे विधान केलं आहे. धनुष्यबाण कोणाचा आहे? न्यायालयात काय निर्णय होईल? असे प्रश्न विचारले असता, गुलाबराव पाटील म्हणाले, “न्यायालयाच्या लढाईत आम्हाला फारसं बोलता येणार नाही. पण अशा स्थितीत कोणत्याही ठिकाणी सामान्यत: डोकी मोजली जातात आणि डोक्यांनाच महत्त्व असतं. तसेच आम्ही अद्याप शिवसेना पक्ष सोडला नाही. त्यामुळे असा संभ्रम कुणी तयार करत असेल तर तो करू नये. आम्ही पार्टी सोडलेली नाही. आम्ही पार्टीच्या अंतर्गत हा उठाव केलेला आहे.”

“पक्ष सोडला असता तर धनुष्यबाण कोणाचा? असे प्रश्न पडले असते. मात्र, शिवसेना पक्षानं नैसर्गिक युती करावी, अशी मागणी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांकडे केली होती. बहुतांशी आमदारांनी हीच मागणी केली होती. पण ही मागणी न ऐकल्यामुळे आम्हाला हा उठाव करावा लागला. आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच राहणार आहे” असं मोठं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे.

हेही वाचा- कोल्हापुरात शिवसैनिकांचा बंडखोर खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा; तर धैर्यशील माने म्हणाले…

मंत्रीमंडळ विस्तार कधी होईल? असा प्रश्न विचारला असतान गुलाबराव पाटील म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार कधी होईल? याचा कधी विचारच केला नाही. जो व्यक्ती मंत्रीपद सोडून आलाय, तो कशाला अशा गोष्टींचा विचार करेन? ८ मंत्र्यांनी राजीनामा देण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. लोकं सत्तेकडे जातात आम्ही सत्तेतून बाहेर पडलोय, मंत्रीपदं आमच्याकडे होती. लोकं साधं सरपंचपददेखील सोडत नाहीत. आम्ही कॅबिनेट मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद सोडलंय, याचाच अर्थ आम्हाला आमचा धनुष्यबाण वाचवायचा होता. शिवसेना वाचवायची होती, त्यामुळे मंत्रीपद कधी येईल? किंवा न्यायालयात काय निर्णय लागेल, याच्याशी आम्हाला काही देणं-घेणं नाहीये, आम्हाला शिवसेना वाचवायची आहे” असं स्पष्टीकरण गुलाबराव पाटलांनी दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena rebel mla gulabrao patil on dhanushyaban and aaditya thackeray jalgaon rmm
Show comments