शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. बंडखोरी केल्यानंतर सुरुवातीला सौम्य भूमिका घेणारे बंडखोर आमदार आता आक्रमक होताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांनी आपल्या कार्यालयातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचे फोटो हद्दपार केले आहेत. तसेच अनेक बॅनर आणि पत्रिकेतूनदेखील ठाकरे कुटुंबाचे फोटो गायब झाले आहेत.
अलीकडेच शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवले आहेत. त्यांच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. दुसरीकडे, बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी दहीहंडीनिमित्त छापलेल्या पत्रिकेतूनदेखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या फोटो गायब आहेत.
याबाबत विचारला असता प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, फोटो हे वृत्तपत्रातून, पत्रिकेतून आणि होर्डिंग्जमधून हटवले जातात. त्यांना हृदयातून काढलं जात नाही. ठाकरे परिवारातील प्रत्येक व्यक्तीचा फोटो माझ्या हृदयात शेवटपर्यंत असेल, असंही सरनाईक म्हणाले. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
त्यांनी पुढे सांगितलं की, “सध्या राज्यात आमचं सरकार आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं मतं मागत आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आहोत. पाच-पाच वेळा निवडून आलो. मी तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ८४ हजारांपेक्षा अधिकच्या मताधिक्यानं निवडून आलो. परंतु सध्या राज्यात काय परिस्थिती आहे? याची कल्पना तुम्हाला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो वृत्तपत्रातून, पत्रिकेतून किंवा होर्डिंग्जमधून काढले जातात, हृदयातून नाही. ठाकरे परिवारातील प्रत्येक व्यक्तीचा फोटो माझ्या हृदयात शेवटपर्यंत असणार आहे” असं प्रताप सरनाईक म्हणाले.