शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली आहे. “वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. सध्या तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर नक्कीच येणार आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान उद्धव ठाकेरंच्या टीकेला शिंदे गटाचे समर्थक संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.
Uddhav Thackeray Interview: करोनावर मात ते शिंदेंची बंडखोरी, पाहा उद्धव ठाकरेंची रोखठोक मुलाखत
आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर नाराजी व्यक्त केली आहे. आमची हयात शिवसेनेत गेली असून आम्ही पालापोचाळा नाही असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही असं ते म्हणाले आहेत. बाळासाहेब तुमची संपत्ती नाहीत असंही त्यांनी सांगितलं आहे.
“उद्धव ठाकरे सेनाप्रमुख होऊ शकत नाहीत”
उद्धव ठाकरेंनी टीका करताना यांना मुख्यमंत्रीपदही पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे. शिवसेना प्रमुखांसोबत स्वत:ची तुलनाच करु लागला आहात अशी टीका केली आहे. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले “आमचं काय घेऊन बसला आहात, उद्धव ठाकरेदेखील शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाहीत. आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या पायाशी बसून राहू इच्छित आहोत. आम्हाला शिवसेनाप्रमुख होण्याची गरज नाही. आमच्यासाठी शिवसेनाप्रमुख आदरणीय आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही असं कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. आमची लायकी आहे का शिवसेनाप्रमुख होण्याची? आम्ही त्यांच्याशी कधीच बरोबरी केली नाही”.
“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी गेले होते, ही आमची निष्ठा आहे. एक वेळ तुम्हाला विसरु, पण शिवसेनाप्रमुखांना विसरणार नाही,” असंही ते म्हणाले.
“बाळासाहेब तुमची संपत्ती नाही”
“बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि पुण्याईमुळेच आम्ही मंत्री, आमदार, खासदार आहोत. त्यांना तुम्ही इतकं छोटं करण्याचा प्रयत्न का करत आहात? राजकारण करायचं असेल तर आपला ठसा उमटवा. शिवसेनाप्रमुखांनी खाली खेचू नका, ते तुमची संपत्ती नाही. ते प्रत्येत शिवसैनिकाचं दैवत आहे,” असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे.
“पालापोचाळा कसं म्हणू शकता?”
“पालापोचाळा कसं म्हणू शकता? सर्व मोठ्या लोकांच्या सावलीत आम्ही वाढलो. शिवसेनाप्रमुख महाराष्ट्रभर फिरत नव्हते, पण सर्व मोठ्या नेत्यांनी गावांमध्ये, खेड्यात जाऊन शिवसेना रुजवायचं काम केलं. त्यांना पालापोचाळा म्हणता येणार नाही. आमच्या आयुष्यातील महत्वाचे दिवस शिवसेनेत घालवले आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याने शिवसेनेत ३८ वर्ष घालवली आहेत. आजच्या घडीला तुम्हाला आम्ही पालापाचोळा वाटतो? उद्या तुम्हाला कोणी पालापाचोळा म्हटलं तर काय होईल याचं भान ठेवा,” असंही ते म्हणाले आहेत.
पाहा व्हिडीओ –
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की, ज्या वेळी मी ‘वर्षा’त राहात होतो तेव्हाचा अनुभव कथन केला होता. या घराच्या आवारातच दोन झाडं आहेत. एक आहे गुलमोहराचं आणि दुसरं आहे बदामाचं. दोन्ही झाडं मी साधारणतः गेली दोन-एक वर्षे बघतोय. ज्याला आपण पानगळ म्हणतो. त्यात पानं पूर्ण गळून पडतात. फक्त काडय़ा राहतात. आपल्याला वाटतं, अरे या झाडाला काय झालं? पण दोन ते तीन दिवसांत पुन्हा नवीन कोंब येतात, अंकुर येतात आणि मी बघितलंय, आठ ते दहा दिवसांत ते बदामाचं झाड पुन्हा हिरवंगार झालं. गुलमोहरसुद्धा हिरवागार झाला. म्हणून ही सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत. जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत. त्यांना झडून जाऊ द्या,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात”
“खरं सांगायचं तर मला चिंता नाहीये. चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकूल नाहीये. मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंटय़ांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे. म्हणून मी जे म्हटलं की, हा पालापाचोळा सध्या उडतोय; तो उडू द्या. इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात. म्हणजे नवी पालवी फुटेल,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.