महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतली आहेत. असं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार काम करतात, अशी चर्चा सोशल मीडियात रंगत आहेत. काही दिवसांपूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एका कागदावर काहीतरी मजकूर लिहून एकनाथ शिंदे यांना दिला होता. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी कागदावरील मजकूर वाचून पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

या घटनेनंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा मान-सन्मान राखला जात नाही, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. या टीकेला उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचा एक सहकारी म्हणून मला असं वाटत नाही. आमच्या ५० जणांमध्ये चल-बिचल निर्माण व्हावी, म्हणून विरोधकांकडून जी खेळी केली जात आहे. त्याला आम्ही ५० जण बळी पडू असं वाटत नाही. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांचा योग्य तो मान-सन्मान केला जात आहे. माईक बाजुला करण्याचा आणि चिठ्ठी लिहून देण्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: केला आहे. त्यांनी खुलासा केल्यानंतर आता मी त्यावर बोलणं योग्य नाही. पण एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण व्हावं, यासाठी कुणीही कार्यरत नाही, याची मला पूर्ण खात्री आहे” असं उदय सामंत म्हणाले.

सिंधुदुर्ग ही मनोरंजनाची नगरी- उदय सामंत

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि भाजपा नेते निलेश राणे हे एकमेकांची लायकी काढणारी भाषा करत आहेत. याबाबत विचारलं असता सामंत म्हणाले, २० तारखेपासून आपण सर्वजण तणावात होतो. त्यानंतर काहीतरी मनोरंजन पाहिजे की नाही, तसेच सिंधुदुर्ग ही मनोरंजनाचीनगरी आहे. आम्ही युतीमध्येच आहोत आणि सर्वांचं मनोरंजन व्हावं, यासाठी त्यांचा कार्यक्रम सुरू असल्याचे उदय सामंतांनी सांगितलं.

Story img Loader