शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. अनेक खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारीदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यादेखील अलीकडेच शिंदे गटात सामील झाल्या आहेत. यानंतर आता काही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश करायला सुरुवात केली आहे. शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांचे भाऊ संजय जाधव यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यानंतर आता खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनीदेखील आपल्या हातावर शिवबंधन बांधलं आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रशांत सुर्वे हे व्यवसायाने वैमानिक असून त्यांनी अनेक वर्षे एअर इंडिया आणि इंडियो विमान कंपनीत वैमानिक म्हणून काम केलं आहे. २०१४ साली त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती.
दरम्यान, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चाचपणी केली होती. पण त्यावेळी शिवसेना पक्षात भावना गवळी असल्याने उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्यास नकार दिला होता. पण आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. भावना गवळी शिंदे गटात सामील झाल्या आहेत. त्यानंतर प्रशांत सुर्वे यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. २०१३ साली भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा घटस्फोट झाला होता.
हेही वाचा- अकोला : शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांना घरातूनच धक्का; बंधू संजय जाधव शिवसेनेतच!
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, “२०१३-१४ साली आपण शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत उद्धव ठाकरेंकडे विचारणा केली होती. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या मला हे योग्य वाटत नाही. मी पक्षाकडून कोणतीही जबाबदारी देऊ शकणार नाही. त्यावर मी त्यांना आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला थांबवलंय नाही किंवा पाठिंबाही दिला नाही.” उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे खूप वर्षांपासूनचे संबंध आहेत. हे संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे. येथून पुढे आपण एक शिवसैनिक म्हणून वाशिम जिल्ह्यासाठी काम करू, असंही त्यांनी म्हटलं आहे.