मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा वापर शिवसेनेविरोधात “कॉन्ट्रॅक्ट किलर”प्रमाणे होत आहे असा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. ‘सामना’मधील रोखठोकमधून शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना अद्यापही वेळ गेलेली नाही सांगत सावरण्याचा सल्लाही दिली आहे. शिंदे यांनी कुठेतरी स्वत:ला ब्रेक लावायला हवा असं शिवसेनेने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे ‘रोखठोक’मध्ये

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचंड कष्टातून निर्माण केलेली शिवसेना दिल्लीतील राज्यकर्त्यांनी कपट-कारस्थानाचे घाव घालून कागदोपत्री संपवली. त्याकामी महाराष्ट्रातील एक शिंदे व त्यांच्या चाळीस गारद्यांची मदत घेतली. शिवसेना हे ज्वलंत नाव गोठवले गेले. बाळासाहेब ज्याची रोज पूजा करीत ते धनुष्यबाण चिन्हदेखील गोठविण्यात आले. महाराष्ट्राची कवचकुंडलेच शिंदे व त्यांच्या गारद्यांनी दिल्लीच्या चरणी अर्पण केली. जीवनात काही गोष्टी पवित्र मानाव्यात, राजकारणाच्या पलीकडे मानाव्यात, हे सध्याच्या राज्यकर्त्यांना समजण्यापलीकडे आहे. शिवरायांची भवानी तलवार ही कथा की दंतकथा ते माहीत नाही, पण शिवसेना म्हणजे मराठी माणसांच्या रक्षणासाठी उपसलेली भवानी तलवारच आहे. राजकारण या भवानी तलवारीपर्यंत भिडले. त्या भवानी तलवारीचे असे अधःपतन ‘‘आम्ही शिवरायांचे मावळे’’ वगैरे म्हणणाऱ्यांनीच केले,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“शिवसेनेच्या कोणत्याही गोष्टीसंबंधात मराठी माणसांच्या भावना तीव्र आणि नाजूक आहेत. शिंदे नावाचे गृहस्थ आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आहेत व ते सत्तेच्या बळावर राज्यात प्रतिशिवसेना स्थापन करू पाहत आहेत. हे म्हणजे मोगलांत सामील झालेल्या एखाद्या गद्दाराने ‘‘शिवराय कोण? हिंदवी स्वराज्याचे खरे मालक आम्हीच!’’ असा दावा करण्यासारखे आहे. महाराष्ट्रात दोन शिवसेना निर्माण करून दुष्मनांनी त्यांचे काम केले आहे. शिंद्यांनी हरून अल रशीदप्रमाणे वेषांतर करून संध्याकाळनंतर बाहेर पडावे व जनता आपल्याविषयी काय बोलतेय ते समजून घ्यावे. लोक एकच चर्चा करतात, ‘‘कोण शिंदे? महाराष्ट्र मोडण्याचा व शिवसेना खतम करण्याचा अधिकार या माणसाला कोणी दिला?’’,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

‘शिवसेनेचा एकही खासदार निवडून येऊ देणार नाही’, नारायण राणेंच्या विधानावर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले “अशा लोकांकडे…”

“शिंदे नावाचा एक इतिहास आहे. तो इतिहास इमानाचा आणि शौर्याचा आहे, पण या शिंद्यांमुळे अनेक शिंदे खजील झाले. पानिपतावर दत्ताजी शिंदे यांनी शौर्याने बलिदान दिले. महाराष्ट्र त्यांचे सदैव स्मरण करतो. संसदेत ‘गोडसे’ हा शब्द असंसदीय ठरवला तसा ‘शिंदे’ शब्द महाराष्ट्रात तिरस्करणीय, असंसदीय ठरेल काय? ‘लखोबा लोखंडे’स पर्यायी शब्द म्हणून सध्याच्या शिंद्यांचा उल्लेख होऊ शकतो. या घडीस एकनाथ शिंदे यांचे वर्तन महाराष्ट्रात सगळय़ात तिरस्करणीय ठरत आहे. ‘एकनाथ शिंदे’ हे नाव ‘most hated speech’ प्रमाणे ‘most hated name’ ठरत आहे. इतर सर्व निष्पाप, कर्तबगार शिंद्यांची क्षमा मागून हे लिहावे लागते. एका शिंद्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजिरावर खंजीर खुपसून शिंद्यांच्या इतिहासाला, परंपरेला काळिमा फासला आहे!,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“शिंदे, सत्तार, भुसे, सामंत, आबीटकर, सरवणकर, कुडाळकर, सरनाईक या टोळीने महाराष्ट्रावर घाव घातला. हा एकप्रकारे व्यभिचारच आहे. शिवसेनेचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला, धनुष्यबाणाशी दावा मांडला. त्याची गरज होती काय? शिंदे व त्यांच्या टोळीने शिवसेना सोडली इथपर्यंत ठीक. त्यांनी त्यांचा मार्ग निवडला. राजकारणात हे असे घडायचेच, पण या टोळीने शिवसेनेचा ‘रिपब्लिकन पार्टी’ करण्याचा प्रयत्न केला. देवळात घुसून 56 वर्षे पुजलेल्या मूर्तीवर घाव घालून तुकडे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नव्हे, शिंदे व त्यांच्या टोळीने मोगलांप्रमाणे मंदिर व मूर्ती तोडली आहे. अशा मूर्तिभंजकांना दिल्लीचे आशीर्वाद मिळाले आहेत. महाराष्ट्राला भाजपने काय दर्जाचे मुख्यमंत्री दिले आहेत ते पहा व श्री. फडणवीस अशा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत,” असा आरोप शिवसेनेने केला आहे.

‘बाळासाहेबांना अटक केल्याची खंत वाटते का?’; छगन भुजबळ म्हणाले, “जर मी गुन्हा नोंदवला नसता, तर…”

“शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. निवडणूक लढवायची हे ठरल्याने श्रीमती लटके यांनी मुंबई महानगरपालिकेतील त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला, पण पालिका आयुक्तांनी तो मंजूर केला नाही. लटके या शिंदे गट व भाजप युतीच्या उमेदवार झाल्या तरच राजीनामा मंजूर करू, असे त्यांना सांगण्यात आले. राजीनामा मंजूर झाला नाही तर लटके यांची कोंडी होईल व त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. लटके यांनी शिंदे गटात यावे हा पहिला दबाव व पालिकेने त्यांचा राजीनामा तोपर्यंत मंजूर करू नये हा दुसरा दबाव! जनसेवेचे हे अनोखे उदाहरण राज्यात घडले आहे. श्री. शिंदे यांना शिवसेना फोडल्याचे इनाम म्हणून राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले. नारायण राणे व त्याआधी भुजबळांसारख्या नेत्यांनाही हा ‘लाभ’ झाला नाही, पण शिंदे यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची व नेता म्हणून प्रतिष्ठा कमावण्याची संधी गमावली. आता असे दिसते की, भाजप त्यांचा वापर ‘कॉण्ट्रक्ट किलर’प्रमाणे शिवसेनेचा काटा काढण्यासाठी करून घेतोय. हे लोकांना पसंत नाही,” असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

“बीकेसीचा दसरा मेळावा व त्यात दीड तासाचे वाचून दाखवलेले भाषण यामुळे शिंदे हे नेते नसून ‘कॉण्ट्रॅक्ट किलर’च्या भूमिकेत आहेत या भूमिकेवर ठसा उमटला. पुन्हा ‘‘माझीच शिवसेना खरी’’ व त्यासाठी भाजपची यंत्रणा हाताशी धरून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवली हा चीड आणणारा, हळहळ निर्माण करणारा विषय. शिंदे यांच्या अधःपतनाची ही सुरुवात आहे. माझ्या नातवाचा जन्म झाला व उद्धव ठाकरे यांचे अधःपतन सुरू झाले, असे ते बीकेसी मेळाव्यात म्हणाले ते खरे नाही. शिवसेना फोडल्यानंतर शिंदे हे खलनायक ठरले व लोक त्यांचा तिरस्कार (Hate) करीत आहेत. हे कोणाचे अधःपतन? मुख्यमंत्रीपद हे यश नसून लाचारी व गुलामी आहे. महाराष्ट्र ते पाहतोय. पुन्हा शिवसेनेला ‘मशाल’ चिन्ह मिळताच त्या मशालीस आव्हान देण्यासाठी समता पार्टीचे लोक शिवसेनेच्या विरोधात उभे केले गेले. गेल्या अनेक वर्षांत समता पार्टी व त्यांची मशाल कोठेच नव्हती. हे सर्व आर्थिक उलाढालीचे व खोक्यांचे प्रताप आहेत. व्यभिचारातून मिळालेल्या सत्तेचे मोल नसते व शिवसेना संपविणे याच ईर्षेतून काम करणारे महाराष्ट्रात टिकले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्रात रोज अनेक नातवंडे व पतवंडे जन्म घेत असतात. त्यांच्या आशीर्वादाने शिवसेना मशालीसारखी धगधगत राहील,” असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

“शिवसेनेपासून दूर होऊन स्वतंत्रपणे काम करायला हरकत नव्हती, पण शिंदे यांना भाजपने कॉण्ट्रॅक्ट किलर म्हणून वापरले. अशा कॉण्ट्रक्ट किलर्सचा राजकीय अंतही वाईट होतो. महाराष्ट्राचा इतिहास व हिंदू धर्मशास्त्र हेच दर्शवते! अशा वेळी खोके निरुपयोगी ठरतात याची प्रचिती लवकरच येईल. शिंदे, अद्यापि वेळ गेलेली नाही! स्वतःला आवरता आले तर बघा!!,” असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena saamana rokhthok maharashtra politics shinde faction eknath shinde bjp uddhav thackeray sgy