ठाकरे गटाचे नेते संजय राऊत कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या वेळी जायला पाहिजे होते. तिथे त्यांच्या अंगावर सर्वजण पडले असते आणि राऊत चेंगरले असते तर कमीत कमी शहीद झाले असते, असं वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बुधवारी केलं त्यावर आता संजय राऊत यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. कुंभमेळ्यात मागच्या आठवड्या मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत ३० जणांचा बळी गेला. या घटनेबाबत जेव्हा संजय राऊत यांनी टीका केली होती त्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता संजय शिरसाट यांनी जे वक्तव्य केलं त्यावर राऊत यांनी त्यांच्या शैलीत शिरसाट यांना गद्दार म्हणत उत्तर दिलं आहे.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले होते?
रोज तोंडातील घाण पसरवण्यापेक्षा गंगेत गेला असे तरी सांगितलं गेलं असतं. पण दुर्दैव आहे. आम्हाला ती संधीही त्यांनी दिली नाही, असंही वक्तव्य शिरसाट यांनी केले. वर्षा बंगल्यात रेडे आणि शिंगं पुरण्यात आल्याचे ते म्हणतात. मलाही बंगला नाही. मग माझ्या येथेही रेड्याचे शिंग आहे का? त्यामुळे अशी विधाने करणं राऊतांनी थांबवलं पाहिजे, असंही संजय शिरसाट म्हणाले. तुम्हाला वाटते तुम्ही विद्वान आहात. पण लोक तुम्हाला मूर्खात काढतात हे सत्य आहे. अशा पद्धतीने बोलून लोकांमध्ये अंधश्रद्धा पसवरणे तुमच्या अंगलट येईल. लोक आणि सरकार तुमचा बंदोबस्त करेल, असंही संजय शिरसाट म्हणाले होते त्यांना आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी काय उत्तर दिलं?
आम्ही प्रयागराजला जाणार आहोत. आम्ही कामाख्याला रेडे कापायला जाणार नाही. आम्ही श्रद्धावान हिंदू आहोत. त्यामुळे प्रयागराजला जाणार. श्रद्धा, हिंदुत्व यात गद्दारीला स्थान नाही. छत्रपती शिवराय लाच देऊन सुटले असं सांगणारे लोक तुमच्या राज्यात वावरत आहेत. तुमची विचारसरणीही तीच आहे. चेंगरुन कोण मरणार हे तुम्हाला दिसेल. आम्ही स्वतः शिवसेनेचे काही लोक जाणार आहेत. सध्या व्हिआयपी लोक जात आहेत. त्यानंतर आम्ही प्रयागराजला जाऊ.
संघाचा जुना अजेंडाच उफाळून आला-राऊत
राहुल सोलापूरकर जे बोलले तो संघाचा जुना अजेंडा आहे. महापुरुषांचा अपमान करणं हा संघाचा अजेंडा आहे. छत्रपती शिवराय, महात्मा गांधी, वीर सावरकर यांच्यावर टीका केली जाते आहे. संभाजी महाराजांवर विकृत चित्रपट आणून त्यांचं चुकीचं चित्रण केलं गेलं. हे सरकार नेमकं काय करतं आहे? असाही सवाल यावेळी संजय राऊत यांनी विचारला.