राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. मंगळवारी पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“चंद्रकांत पाटील काय म्हणतात त्यावर भूमिका ठरत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली का हे माहिती नाही, मात्र त्यांनी या देशातील सर्वात पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार हिंदूह्रदयम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्याआधी वीर सावकर यांनी महाराष्ट्रात आणि देशात रुजवला,” असं संजय राऊत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली; वाजपेयी, मोदींनी त्यावर कळस चढवला- चंद्रकांत पाटील

“बाळासाहेबांना हिंदूह्रदयसम्राट अशी उपाधी देशातील जनतेने दिली. ज्याप्रमाणे मराठी माणसाला मराठी म्हणून मत द्यायला लावलं, त्याप्रमाणे एक दिवस देशातील हिंदूंना मी हिंदू म्हणून मत द्यायला लावीन असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याच प्रमोद महाजन म्हणाले होते. बाळासाहेबांनी १९९२ नंतर करुन दाखवलं. पार्ल्यातील पोटनिवडणुकीत शिवसेना प्रथम हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली. तेव्हा हिंदू म्हणून आपण निवडणूक लढायला हवी असा विचार तेव्हा कोणाच्याही मनात आला नव्हता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या आमदारांचं निलंबनही झालं होतं. रमेश प्रभू, सुर्यकांत महाडिक आणि आणखी एका आमदाराला हिंदू व्होट बँक म्हणून मतं मागितल्याने तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्याने अपात्र ठरवण्यात आलं होतं,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“महाराष्ट्रात किंवा देशात भाजपाच्या एखाद्या आमदाराला, खासदाराला हिंदू व्होट बँक या मुद्दयावर निवडणूक गमावावी लागली असं वाटत नाही. आम्ही लढलो, आम्ही जिंकलो. देशात हिंदू व्होट बँक आहे हा विचार सर्वात प्रथम या देशात बाळासाहेब ठाकरेंनी मांडला. कोणी कोणत्या भ्रमात आहेत माहिती नाही. पण या देशाची जनता बाळासाहेबांचं योगदान कधी विसरणार नाही,” असं यावेळी ते म्हणाले.

“अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू व्होट बँकवाले पळून गेले आणि शिवसेना, शिवसेनाप्रमुख ठाम उभे राहिले. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला गर्व आहे हा त्याचाच एक भाग होता. आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही. आम्ही ठामपणे उभे राहतो, लढतो आणि विजय प्राप्त करतो. फक्त राजकारणासाठी, निवडणुकांच्या सोयीसाठी, मंदिरांसाठी आमंच हिंदुत्व नाही. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार यासंदर्भात ते आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “व्होट बँकेचं राजकारण ज्यांना करायचं आहे त्यांना करु देत. पण इतिहासाची पानं पुन्हा एकदा चाळली पाहिजेत. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर असलेली हा पानं कधीच कोणाला फाडता आणि पुसता येणार नाहीत.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले –

“तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut bjp chandrakant patil chhatrapati shivaji maharaj hindu vote bank sgy