गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण रंगताना दिसत आहे. आधी राज्य सरकारने राज्यपालांना निवडणुकीसाठी परवानगी देण्याची विनंती करणारं पत्र पाठवलं, तर त्यावर राज्यपालांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारच्या पत्रावर नाराजी व्यक्त करणारं उत्तर देणारं पत्र पाठवलं. यावरून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा सामना नव्याने रंगताना राज्यात दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रांवरून होणाऱ्या राजकारणावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना खोचक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, राज्यपालांविषयी संजय राऊतांनी एक अजब दावा देखील केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या पत्रात वापरण्यात आलेली भाषा ही धमकीवजा आणि अपमानजनक असल्याची तक्रार केली होती. तसेच, राज्य सरकार ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ पाहतंय, ती घटनाविरोधी असल्याचं म्हणत त्याला परवानगी देखील नाकारली होती. मात्र, राज्यपालांचा दावा संजय राऊतांनी फेटाळून लावला आहे.
“राज्यपालांना कोण धमकी देणार?”
राज्यपालांनी राज्य सरकारवर धमकीवजा भाषा वापरल्याचा दावा राज्यपालांनी केल्यानंतर त्यावर संजय राऊतांनी खोचक प्रश्न केला आहे. “मी राज्यपालांनाही ओळखतो आणि मुख्यमंत्र्यांनाही ओळखतो. खूप वर्षांपासून मी त्यांना ओळखतो. राज्यपाल महाराष्ट्रात आले नव्हते, तेव्हापासून त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालांना कोण धमकी देणार?”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
‘शिवसेना धमक्या देत नाही”
दरम्यान, शिवसेना किंवा उद्धव ठाकरे धमक्या देत नाहीत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. “उद्धव ठाकरेंना जे ओळखतात, ते सांगतील की त्यांचा स्वभाव धमकीचा आहे का? त्यांची धमकी काय असते, याचा अनुभव आज महाराष्ट्र घेतोय. आज राज्यात काय चाललंय हे तुम्ही बघताय. धमक्या वगैरे अशा पोकळ गोष्टी शिवसेना, शिवसेनेचे नेते करत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री तर अजिबात करत नाहीत. हा साधा सरळ विषय आहे. विधानसभा अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या घोळानंतर हा पत्रव्यवहार झाला आहे”, असं राऊत यावेळी म्हणाले.
“राष्ट्रपती काय तुमच्याकडे गोट्या खेळतायत का?”, सुधीर मुनगंटीवारांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर!
राज्यपालांच्या मनात मुख्यमंत्र्यांविषयी सद्भावना!
राज्यपाल सुस्वभावी असल्याचं राऊत यावेळी म्हणाले आहेत. “राज्यपाल हे सद्गृहस्थ आहेत. वडीलधारे आहेत. सुस्वभावी आहेत. उद्धव ठाकरेंविषयी त्यांच्या मनात सद्भावना आहेत. उद्धव ठाकरे संत पुरुष आहे हे त्यांनी कायम म्हटलं आहे. मग हा संतपुरुष धमकी कशी देईल?”, असा खोचक सवाल देखील राऊतांनी केला आहे.