सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) ठाकरे सरकारमधील आणखी एका नेत्याची चौकशी करण्यात आली आहे. ईडीने मंगळवारी शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची तब्बल आठ तास चौकशी केली. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहेत. दरम्यान रवींद्र वायकर यांची चौकशी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“रवींद्र वायकर चौकशीला जातील आणि आपली भूमिका माडंतील. भाजपाच्या कार्यालयातून जर ईडीची सूत्रं हलत असतील तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आमची सहानुभूती असणाऱ्यांना असा त्रास होणार हे आम्ही गृहितच धरलं आहे,” असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
“जसं काल जया बच्चन यांच्या सूनबाई आणि मुलाच्या बाबतीत आम्ही ऐकलं. जे जे सरकारविरोधात बोलतील, सरकारला प्रश्न विचारतील त्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी यांच्यासमोर उभं करुन अपमानित केलं जाईल. त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला जाईल हे सूत्र झालं आहे. हे २०२४ पर्यंत चालेल. त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल,” असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
काय आहे प्रकरण –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी केली असून गैरव्यवहार केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे. या जमीन खरेदी व्यवहाराबद्दल त्यांनी ३ मार्चला रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. जमिनींच्या दस्तऐवजात छेडछाड करण्यात आलेली आहे. वन कायद्याचा भंग, वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी तक्रारीत केलेला होता. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे.
उद्धव ठाकरेंकडून जमीन खरेदी प्रकरणात पदाचा गैरवापर; सोमय्या यांचा गंभीर आरोप
रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांकडून घेतली जमीन; किरीट सोमय्या यांचा गंभीर गौप्यस्फोट
अलिबागमधील कोर्लाई येथील जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि ही माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचाही उल्लेख सोमय्यांनी केला होता. तसंच मुंबईत महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात रविंद्र वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवा यांच्याकडून २५ कोटींचा मोबदला मिळाल्याचा सोमय्यांचा दावा आहे.
किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा
दरम्यान एप्रिल महिन्यात रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी किरीट सोमय्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि १०० कोंटीचा मानहानीचा दावा ठोकला. किरीट सोमय्या यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोप करत वायकर दांपत्याने १०० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली. तसंच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना किरीट सोमय्या यांना कोणत्याही प्रकारे प्रतिमा खराब करण्यापासून रोखण्यात यावं अशी मागणीही करण्यात आली होती.