शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेना नेते संजय राऊतांबद्दल नाराजी जाहीर केली. संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगलं बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलत आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या या आरोपावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे संजय राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “मी कोणताही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नसताना तसंच मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नसताना गटनेते पदावरुन का काढलं? संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगलं बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलत आहेत. भूमिका मांडायची मग मुंबईत या असं बोलतात. मग प्रसारमाध्यमांमध्ये वेगळं का बोलत आहेत”.
“जास्तीत जास्त सत्ता जाईल,” संजय राऊत स्पष्टच बोलले, एकनाथ शिंदेंसोबत फोनवरुन केली चर्चा
संजय राऊतांची प्रतिक्रिया –
संजय राऊतांना माध्यमांनी एकनाथ शिंदेंच्या आरोपाबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “आता मी माध्यमांसमोर काय बोललो? सोडून द्या…प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतो. ते आमच्यापासून थोडे लांब आहेत, जवळ आल्यावर बोलू”.
Eknath Shinde Live Updates : लवकरच विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता, संजय राऊत यांनी दिले संकेत
“माझी एकनाथ शिंदेंसोबत तासभर चर्चा”
“आज सकाळीच माझं एकनाथ शिंदेंसोबत बोलणं झालं आहे. त्यांच्याशी पक्षाचा संवाद सुरु आहे. ते शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत त्यांनी शिवसेनेचंच कार्य केलं आहे. त्यांच्याशिवायी आमच्या मनात कायम आदर आहे. चर्चा, संवाद सुरुच असतात. एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेबद्दल मी उद्धव ठाकरेंनाही कल्पना दिली आहे. शिवसेनेत काही होतंय असं वाटत असेल तर तसं नाही. बाहेर असणारे सर्वजण शिवसैनिक असून त्यांना शिवसेनेसोबतच राहायचं आहे. काही गैरसमजातून या गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर केल्या जातील,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
“शिवसेनेने राखेतून उठून गरुडझेप घेतली आहे”
भाजपासोबत सरकार स्थापन करण्याच्या मागणीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मला असं वाटत नाही. भाजपाला जर ठाकरे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल असं वाटत असेल तर शिवसेनेत राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. याआधी अनेकदा शिवसेनेने राखेतून उठून गरुडझेप घेतली आहे. हा गेल्या ५६ वर्षांचा इतिहास आहे. पण एकनाथ शिंदे आमचे मित्र, सहकारी हे अत्यंत जीवाभावाचे असून सकारात्मक चर्चा सुरु आहे”.
शिवसेनेला महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं होतं त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचलल्याच्या दाव्यावर बोलताना ते म्हणाले की, “शिवसेना असे पाठीमागून वार करत नाही. काल आणि आज सकाळीदेखील शरद पवारांशी माझी चर्चा झाली. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे”.