देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत संवाद साधला. पंतप्रधान मोदींची या वर्षातील मुख्यमंत्र्यांसोबतची ही पहिलीच बैठक होती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी, ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा, असं सांगितलं. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीसाठी उपस्थित होते.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले होते. यावरुन राज्यातील भाजपा नेते टीका करत असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करत उत्तर दिलं आहे. यावर मुख्यमंत्री सचिवालय खुलासा करेल असं त्यांनी सांगितलं आहे.
“मुख्यमंत्री नाही हजर राहिले, कधी काळी पंतप्रधानही एखाद्या बैठकीला हजर राहणार नाहीत. ज्यांच्याकडे सगळी सूत्रं आहेत ते आरोग्यमंत्री होते. त्यांना कमी का लेखत आहात?,” अशी विचारणा यावेळी संजय राऊतांनी केली.
मात्र यावरुन भाजपा टीका करत आहेत यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “भाजपाच्या आय़ुष्यात टीका करण्याशिवाय दुसरं काय आहे. खरं तर भाजपाने चीनने केलेल्या घुसखोरीवर बोललं पाहिजे. तिथे सीमेवर फार गंभीर स्थिती आहे. भारत-पाकिस्तानवर रोज बोलत आहे, पण आता भारत-चीनवर बोला आणि टीका करा”.
चंद्रकांत पाटलांना उत्तर –
चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “या संपूर्ण देशात कोणतं राज्य नीट असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील किवं भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. नेत्रतज्ञ डॉक्टर लहानेंचं एखादं पथक भाजपाच्या कार्यालयात पाठवता येईल का हे पाहतो. त्यांना श्रवणयंत्रपण देणार आहे. शिवसेना असे मेडिकल कॅम्प घेत असतं. जर कोणाला गरज असेल तर त्यांच्यावर उपचार करु. महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे सुरु आहे”.
“मुंबै बँकेच्या अध्यक्षपदीही महाविकास आघाडीचं नेतृत्व आलं आहे. हळूहळू या सगळ्या संस्था, संघटना यावर महाविकास आघाडीचा कब्जा असेल. चंद्रकांत पाटील हे फार सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट आहेत. त्यांनी पुढील निवडणुकीची तयारी करावी. उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं,” असा सल्ला यावेळी संजय राऊतांनी दिला.
राज ठाकरेंच्या पत्रावर प्रतिक्रिया –
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी पाट्यांसंबंधीच्या निर्णयावर केलेलं वक्तव्य आणि सल्ल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हापासून आंदोलन सुरु आहे. आमची स्थानिय लोकाधिकार समिती, अन्य संघटना आजही या प्रकारचं काम करतात. अनेक पक्ष आमच्या पक्षातून बाहेर गेले आहेत, पण जाताना तोच विचार घेऊन बाहेर गेले आहेत. कोण काय बोलतं यावर महाविकास आघाडी किंवा शिवसेनेचं धोरण ठरत नाही”.
“मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे. मराठी अस्मिता राहणार, त्याच्याशी कधी तडजोड करणार नाही,” असं यावेळी संजय राऊतांनी सांगितलं.
मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना इशारा –
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठी पाट्यांचा खर्च सरकारने द्यावा अशी मागणी केली आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ते आम्ही पाहू. महाराष्ट्रात राहत आहात, येथील मातीचं खात आहात, श्वास घेत आहात याचे ऋण फेडण्याची वेळ असताना तुम्ही महाराष्ट्रासंदर्भात अशी वक्तव्यं करणं याला बेईमानी म्हणतात. मग तो खासदार, व्यापारी किंवा कोणीही असो”.
“शिवसेनेचा जन्मच अस्मितेच्या मुद्द्यावर झाला आहे. अशा प्रकारची भाषा दक्षिणेत जाऊन करा,” असं आव्हानदेखील यावेळी त्यांनी दिलं.