उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनादेखील उतरली असून ५० जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचा दौरा केला. यावेळी त्यांनी संयुक्त किसान मोर्चाचे सर्वेसर्वा तथा शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. यावेळी राकेश टिकैत यांना महाराष्ट्रात येण्याचं आमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं असल्याची माहिती संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भेटीसंबंधी बोलताना ते म्हणाले की, “राकेश टिकैत मोठे नेते आहेत. प्रदीर्घ काळानंतर लढाऊ संपवून ते घऱी गेले होते. योद्ध्याला घऱी जाऊन भेटायचं असतं. उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार भेट घेत त्यांच्याशी चर्चा करुन देश आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणाविषयी मत समजून घेतलं. त्यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यांना राजकारणात ओढण्याचा प्रश्न येत नाही. त्यांची संघटना राजकारणात जाणार नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळावेत”.

संजय राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरेंनी फोनवरुन राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. “उद्धव ठाकरेंनी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा केली. ही लढाई संपली नसून सुरु ठेवा असं त्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात येण्यासाठी आमंत्रणही दिलं आहे”, असं संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेना उत्तर प्रदेशात ५० जागा लढणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

गोव्यात प्रफुल्ल पटेल यांनी स्वतंत्रपणे लढू असं सांगितलं आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आम्ही दोघे एकत्र आहोत. मला उद्या गोव्यात तृणमूल काँग्रेसचे काही नेते भेटणार आहेत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut meets farmer leader rakesh tikait up assembly election cm uddhav thackeray sgy