गोव्यात शिवेसना आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली असून विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न होते पण काँग्रेस अनुकूल नसल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. दरम्यान ही आघाडी म्हणजे महाराष्ट्रातील भविष्यातील राजकीय संकेत असल्याची चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना रसातळाला गेली आहे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा टोला, म्हणाले “ते काय टॉलस्टॉय…”
गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत आहेत का? असा सवाल केला असता ते म्हणाले, “भविष्यात काय होणार हे मी गोव्यात बसून कसे सांगू? पुढल्या वाटचालीत हे दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील. गोव्यात आमच्यासोबत यावं अशी सुबुद्धी काँग्रेसला सूचली नाही. पण महाराष्ट्रात आम्ही एकत्र आहोत”.
यावेळी त्यांना राज्यातील काँग्रेस नेते स्वबळाचा इशारा देत असल्यासंबंधी विचारलं असता म्हणाले की, “राज्यात कुणीही स्वबळाचा नारा दिला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत काही ठिकाणी वेगळे लढलो. कारण तळागाळातील कार्यकर्त्यांचा तो निर्णय होता”.
नगरपंचायत निवडणूक निकालावरुन भाजपाला टोला
नगरपंचायत निवडणूक निकालावर बोलताना ते म्हणाले की, “भाजपा क्रमांक एकचा विरोधी पक्ष ठरला आहे. इतरही विरोधी पक्ष आहेत, पण भाजपा पहिल्या क्रमांकावर असून नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी त्यांचं स्थान कायम ठेवल्याबद्दल अभिनंदन करतो. अशीच लढाई हा क्रमांक कायम ठेवण्यासाठी लढच राहा अशा मी शुभेच्छा देतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एकत्रित बेरीजच करावी लागेल आणि ही बेरीज बरीच पुढे आहे”.
नटसम्राट म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले “कोणी खुर्ची देतं का खुर्ची…”
“शिवसेना हा प्रामुख्याने शहरी भागातील पक्ष आहे. राष्ट्रवादीने जास्त जागा लढवल्या असतील. मुंबई, ठाणे, पुणे या भागात नगरपंचायती झाल्या नाहीत, पण जिथे झाल्या तिथे शिवसेना लढली आणि आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे. पण यापुढील अनेक वर्ष महाविकास आघाडी म्हणूनच बेरीज करावी लागेल,” असं राऊतांनी सांगितलं. “भाजपा नेते काहीही म्हणतील, त्यांच्या बोलण्याला काय अर्थ आहे,” असंही ते म्हणाले.
“आम्ही महाविकास आघाडी म्हणून निकालाकडे पाहत आहोत. राज्यात एकत्र सरकार चालवताना एकमेकांचं बोट धरुन चालत आहोत, त्यामुळे तसंच पाहावं लागेल. या निवडणुका खूपच तळागाळात होत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे उद्या काय होईल या दृष्टीने पाहणं गरजेचं नाही. भाजपासोबत असतानाही असाच निकाल येत होता. पण विधानसभा, लोकसभा अशा मोठ्या निवडणुकांमध्ये आम्ही यावर गांभीर्याने विचार करतो. स्थानिक निकालावर तेथील नेते बोलतील,” असं संजय राऊत म्हणाले.