चंद्रकांत पाटील हे फार सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट आहेत. त्यांनी पुढील निवडणुकीची तयारी करावी. उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल असा टोलाही त्यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावाल आहे.
चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “या संपूर्ण देशात कोणतं राज्य नीट असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. नेत्रतज्ञ डॉक्टर लहानेंचं एखादं पथक भाजपाच्या कार्यालयात पाठवता येईल का हे पाहतो. त्यांना श्रवणयंत्रपण देणार आहे. शिवसेना असे मेडिकल कॅम्प घेत असतं. जर कोणाला गरज असेल तर त्यांच्यावर उपचार करु. महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे सुरु आहे”.
“मुंबै बँकेच्या अध्यक्षपदीही महाविकास आघाडीचं नेतृत्व आलं आहे. हळूहळू या सगळ्या संस्था, संघटना यावर महाविकास आघाडीचा कब्जा असेल. चंद्रकांत पाटील हे फार सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट आहेत. त्यांनी पुढील निवडणुकीची तयारी करावी. उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं,” असा सल्ला यावेळी संजय राऊतांनी दिला.
मोदींसोबतच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर भाष्य –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना स्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले होते. यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी त्याच्यावर मुख्यमंत्री सचिवालय खुलासा करेल असं सांगितलं. “मुख्यमंत्री नाही हजर राहिले, कधी काळी पंतप्रधानही एखाद्या बैठकीला हजर राहणार नाहीत. ज्यांच्याकडे सगळी सूत्रं आहेत ते आरोग्यमंत्री होते. त्यांना कमी का लेखत आहात?,” अशी विचारणा यावेळी संजय राऊतांनी केली.
“भाजपाने चीनच्या घुसखोरीवर बोललं पाहिजे”
मात्र यावरुन भाजपा टीका करत आहेत यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “भाजपाच्या आय़ुष्यात टीका करण्याशिवाय दुसरं काय आहे. खरं तर भाजपाने चीनने केलेल्या घुसखोरीवर बोललं पाहिजे. तिथे सीमेवर फार गंभीर स्थिती आहे. भारत-पाकिस्तानवर रोज बोलत आहे, पण आता भारत-चीनवर बोला आणि टीका करा”.