सक्तवसुली संचलनालयाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना अटक केल्यानंतर पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना हे गृहखात्यावरील आक्रमण असल्याचं म्हटलं आहे. ईडीने येऊन धाड टाकून तपास करावा असा गुन्हा नाही. हे राज्यातील पोलिसांच्या हक्कांवर अतिक्रमण आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. तसंत राष्ट्रवादी काँग्रेसला दमदार पावलं टाकण्याचा सल्ला दिला.
“सतीश उके आणि कुटुंबाने जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील, जमीन लुटली किंवा बळाकवली असेल, धमकी दिली असेल तर महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. ईडीने येऊन धाड टाकून तपास करावा असा गुन्हा नाही. हे राज्यातील पोलिसांच्या हक्कांवर अतिक्रमण आहे”.
“सतीश उके यांनी गुन्हा केला असेल, कुटुंबाने धमक्या दिल्या असतील, त्यांच्या लोकांनी खोट्या तक्रारी दाखल केल्या असतील तर राज्याचे पोलीस तपास करतील. त्यासाठी ईडीने आणि सीबीआयने येण्याची गरज नाही. दहशत निर्माण करण्यासाठी त्यांना आणलं जात आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“ओढून ताणून मनी लाँड्रिंग, पीएमएलएशी जोडून आम्ही केंद्राचे पोलीस आणून दहशत निर्माण करु, तुरुंगात टाकू हे कृत्य निषेधार्ह आहे. काही तक्रार असेल तर ती पोलिसांत झाली पाहिजे. हा प्रकार धक्कादायक आहे,” असंही राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे तक्रार केल्यानंतर अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले “आम्ही एकटे…”
“ज्याप्रकारे काश्मीरमध्ये अचानक दहशतवादी घुसतात, बॉम्बहल्ले करतात त्याप्रमाणे या केंद्राच्या दहशतवादी कारवाया आहेत. अटक करुन निघून जातात. जर संघर्ष निर्माण झाला तर केंद्र आणि राज्यात मोठा संघर्ष निर्माण होईल. ममता बॅनर्जी यांनी बिगरभाजपा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र त्याच भूमिकेतून आहे. सर्वांनी एकत्र आलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. ट्रेनमध्ये पाकिटचोरी होते त्याचाच तपास ईडी आणि सीबीआयने करणं बाकी आहे,” असा टोला यावेळी संजय राऊतांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसला सल्ला –
“सतीश उकेंवर झालेल्या कारवाईवर काही म्हणणं नाही पण त्यात केद्रीय तपास यंत्रणांचा हस्तेक्षप आल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राज्याच्या पोलिसांना योग्य सूचना, मार्गदर्शन मिळालं तर काम होऊ शकेल. गृहखात्याने अधिक सक्षम आणि कठोर होणं गरजेचं आहे. माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे,” असा सल्ला यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीला दिला.
“केंद्रीय तपास यंत्रणा घुसत आहेत हे गृहखात्यावरील आक्रमण आहे. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था, तपास यंत्रणा ज्यांच्या अख्त्यारित आहे त्यांनी यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आहिस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत,” असंही संजय राऊत म्हणाले. “गृहखात्याला दमदार पावलं टाकावी लागतील अन्यथा रोज तुमच्यासाठी रोज एक नवा खड्डा खणाल,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.