नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. लोकसत्ताच्या व्यासपीठावरुन बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दावा केला आहे. यानंतर नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचे आणि रोजगाराचे योगदान देण्याची क्षमता आहे. गेली काही वर्षे विरोधामुळे तो प्रकल्प रखडला असला तरी आता महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दिसत असल्याने नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून केलं आहे.

धर्मेद्र प्रधान नेमकं काय म्हणाले –

संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहकार्याने कोकणच्या किनारपट्टीवर ६० लाख टन क्षमतेचा नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने त्याला विरोध झाला. त्यात बहुमूल्य वेळ वाया गेला आहे. पण आता महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रकल्पाचा आकार कमी करून तो कोकणातच उभारण्याचा विचार सुरू आहे. ‘देर आए लेकिन दुरुस्त आए’ या न्यायाने सरकारच्या मतपरिवर्तनाचे स्वागतच केले पाहिजे, असे सांगत धर्मेद्र प्रधान यांनी नाव न घेता शिवसेनेला चिमटा काढला. या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे लाखो कोटी रुपये पुढील काही वर्षांत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत येतील. या प्रकल्पाशी निगडित पूरक उद्योग उभे राहतील आणि त्यातूनही मोठय़ा प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. देशालाही पेट्रोकेमिकल क्षेत्रातील या मोठय़ा प्रकल्पामुळे ऊर्जा सुरक्षिततेचे ध्येय गाठण्यासाठी मदत होईल, असे धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.

संजय राऊतांची प्रतिक्रिया –

“त्यांनी होईल असं म्हटलं असून झालेलं नाही. स्थानिकांचं मतपरिवर्तन झाल्याची माहिती माझ्याकडे नाही. हेमंत प्रधान आता त्या खात्याचे मंत्री नाहीत, ते देशाचे शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी शिक्षणावर अधिक बोललं पाहिजे. मी त्यांना ओळखतो, ते फार हुशार मंत्री आहेत. त्यांनी त्यांच्या काळात मतपरिवर्तनाचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर –

“सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचं आगमन होणं महत्वाची गोष्ट आहे. सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकण शिवसेनेचा बालकिल्ला आहे. आदित्य ठाकरे कार्यक्रमासाठी जात असून शिवसैनिक आणि सिंधुदुर्गामधील जनता त्यांचं स्वागत करेल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

दापोलीतील सोमय्या आणि सांगलीमधील पडळकर यांच्या आंदोलनावर बोलताना संजय राऊत यांनी वैफल्यग्रस्त माणसं, पक्ष, नेते कोणत्या थऱाला जाऊ शकतात त्याचं हे उदाहरण असल्याचा टोला लगावला. तसंच जनताच त्याचा निर्णय घेईल असंही सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “अहिल्याबाई होळकर किंवा महाराष्ट्रात जन्म झालेल्या महापुरुषांचं राजकारण करु नये. शरद पवारांसारख्या नेत्याच्या हातून एका स्मारकारंच उद्धाटन होत असताना अशाप्रकारे राजकीय विरोध होत असेल तर लोकांच्या मानसिकतेमध्ये गडबड आहे”.

“देशात काही राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. कर्नाटकात, सीमा भागात मराठी अल्पसंख्यांक आहे. त्याच्यावर अन्याय, अत्याचार, दडपशाही होत आहे त्याविषय़ी बोललं पाहिजे. त्यासंबंधी केंद्रात एक याचिका आहे, पण त्यावर कोणी बोलत नाही. ते हिंदू नाहीत का? तेदेखील हिंदूच आहेत. असे अनेक विषय चर्चेला येतील आणि आम्ही त्यावर चर्चा करु,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

“गोव्याच्या जनतेने भाजपाला बहुमत दिलं असून आम्ही त्याचं अभिनंदन करतो. नवीन सरकार येत असेल तर गोव्याच्या विकासासाठी, जाहीरनाम्यात दिलेली वचनं त्यांनी पूर्ण करावीत. पाच लाख रोजगार निर्माण करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पण मग १० वर्ष तुमचं राज्य होतं तेव्हा तुम्ही काय केलं हा प्रश्न आम्ही विचारला होता,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

आज-उद्या भारत बंद

“गेल्या ५०-५५ वर्षांपेक्षा अधिक काळ सर्वाधिक रोजगार सार्वजनिक विभाग, सरकारी उद्योगांनी दिला आहे. हे उद्योग संपवून फक्त मर्जीतल्या दोन-पाच खासगी उद्योजकांना संपूर्ण देश ताब्यात दिल्याने रोजगार वाढणार नाही. फक्त मोजक्या लोकांची आणि पर्यायाने भाजपाची संपत्ती वाढेल. कोट्यवधी लोक हे भिकारी आणि बेरोजगार होतील त्याविरोधात हा लोकांचा संताप, बंद आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

“देवाच्या चरणी प्रत्येकाने खरं बोललं पाहिजे. जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात, हिदुत्ववादाचा पुरस्कार करत आहात, देव, धर्म आणि देश मानत आहात तर आपलं वर्तन काय, देवाच्या दरबारात किती खरं बोलत आहोत हे तपासून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात ज्या प्रकारचा खोटेपणाचा कळस उभारला जात आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामीची मोहिम राबवली जात आहे, षडयंत्र रचललं जात आहे, लफंगेगिरी सुरु आहे त्याला हिंदुत्ववादात स्थान नाही. सध्या विरोधी पक्षाचं खोटं बोला पण रेटून बोला सुरु आहे. पण त्यांनी खऱं बोलावं, महाराष्ट्राची हीच परंपरा आहे,” असा सल्ला संजय राऊतांनी यावेळी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on nanar refinery bjp dharmendra pradhan maharashtra government sgy