महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल असं भाकित शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील असा विश्वासही संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरुनही त्यांनी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील हे नक्की आहे. बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं, पण यानंतर ते आपल्याला शिवसैनिक म्हणू शकणार नाहीत. दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही असंही ते म्हणाले.

“राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा दिल्ली स्वारीवर येणार होते, मात्र अचानक रद्द झालं. गेल्या महिन्याभरातील ही त्यांची पाचवी दिल्ली भेट होती. म्हणजे अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षातून चारवेळाही दिल्लीला आलेले नाहीत, पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांना एका महिन्यातच पाच वेळा यावं लागतं. याबद्दल महाराष्ट्राच्या मनात गोंधळ आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली.

उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात; लोकसभा अध्यक्षांच्या ‘त्या’ निर्णयाला आव्हान

“शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीला यावं लागलं नाही. शिवसेनेचं हायकमांड कायम मुंबईत राहिलं आणि आता मुंबईतच चर्चा होत नाही. दिल्लीतील लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते. युती करण्यासंदर्भात अमित शाहदेखील मातोश्रीवर आले होते. मित्रत्वाच्या नात्यातून या गोष्टी घडत होत्या. पाच वेळा मुख्यमंत्र्यांना यावं लागत असल्याने आता बहुतेक ते आपला मुक्काम दिल्लीत हलवतात का असंही वाटू लागलं आहे,” असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.

पाहा व्हिडीओ –

शिंदे गटासोबत संघर्ष सुरु असतानाच उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

“मंत्रिमंडळाची स्थापना अद्याप होऊ शकलेली नाही. एक महिना झाला तरी दोघांचंच कॅबिनेट बेकायदेशीरणे निर्णय घेत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला गेल्या एका महिन्यापासून खेळखंडोबा सुरु आहे. शिवसेनेतून बाहेर पडून काय मिळवलं आणि महाराष्ट्राला काय दिलं याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना सर्व निवडणुका लढवणार असून स्वतंत्र लढायचं की महाविकास आघाडीसोबत याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती संजय राऊतांनी दिली. “भाजपाला शिवसेना फोडायची होती आणि पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं कारस्थान होतं. त्यात त्यांना यश मिळत असलं तरी हे जास्त काळ टिकणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले.

“उद्धव ठाकरेंचा माजी मुख्यमंत्री उल्लेख करणं कद्रूपणा आहे. ते पक्षप्रमुख तसंच सर्वोच्च नेते आहेत. पण तुमच्या मनात त्यांच्याविषयी द्वेष आणि तिरस्कार दिसत आहे. पण हा तिरस्कार आणि द्वेष राज्यातील शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नाही. म्हणूनच मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस साजरा कऱण्यात आला. शिवसेना काय आहे आणि कोणासोबत आहे हे स्पष्ट झालं आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut over maharashtra government eknath shinde supreme court sgy