महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या पार्श्वभूमीवर यंदाचं अधिवेशन वादळी होणार असल्याचे संकेत मिळत असून त्या पार्श्वभूीवर आता शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर खोचक शब्दांत टीका केली आहे. कुठेतरी फुंकर मारतात आणि त्यांना वाटतं वादळ आलं, अशा शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर देखील टीका केली.
“आदळआपट म्हणजे वादळ नाही”
यंदाचं अधिवेशन वादळी होणार का? अशी विचारणा होताच संजय राऊतांनी ती शक्यता नाकारत “आदळआपट म्हणजे वादळ नाही”, असं म्हटलं आहे. “ते आदळआपट करतील. पण आदळआपट करून काही प्रश्न सुटणार नाही. ठाकरे सरकारला साधा चरोटाही उठणार नाही. काल मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रीमंडळ, आमदार, प्रमुख नेते हे छगन भुजबळांच्या निवासस्थानी जमले होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, आमची १७० ची ताकद कायम आहे. त्यामुळे कसलं वादळ निर्माण करणार तुम्ही?”, असं राऊत म्हणाले.
“कुठेतरी फुंकर मारतात आणि त्यांना वाटतं वादळ आलं. अशी वादळं येत नाहीत. अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात वादळ आलं. त्यात सगळे झोपले ते अजून उठले नाहीत”, असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला.
“सापाच्या पिलाला ३० वर्ष दूध पाजलं, आता ते…” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा!
“विरोधकांनी प्रश्न विचारावेत, सरकार उत्तर देईल”
“अधिवेशन उत्तमरीत्या चालावं, राज्याच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी. विरोधकांना प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. आपण संसदीय लोकशाही मानतो. भले संसदेत त्या लोकशाहीला किंमत नसेल. पण महाराष्ट्रातल्या विधानसभेला मोठी परंपरा आहे. त्यानुसार विरोधी पक्षांनी काम करावं. सरकारला विरोधी पक्षांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्यांनी प्रश्न विचारावेत, सरकार उत्तर देईल. हेच राज्याच्या हिताचं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.