मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिका ईडीनं जप्त केल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगू लागला असताना शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना यावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “ईडीचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये हलवण्यात आलं आहे”, असं राऊत म्हणाले आहेत.
“ईडीचं मुख्यालय दिल्लीत आहे. पण काही दिवसांपासून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपाविरोधी सरकार आल्यापासून त्यांचं मुख्यालय या राज्यात आणून ठेवलंय. भाजपाविरोधी पक्षांना या ना त्या कारणाने त्रास द्यायचा असं चाललंय”, असं राऊत म्हणाले.
“आमचं एकमत झालं आहे की…”
श्रीधर पाटणकरांवर करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेविषयी देखील संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. “माझं मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं, हे मी जगासमोर का मांडू? हा आमच्या घरातला विषय आहे. पण माझं, उद्धव ठाकरेंचं, शरद पवारांचं एकमत आहे की या दमनशाहीविरुद्ध एकत्रपणे लढायला हवं. आम्ही वाकणार नाही. आम्हाला घाई नाही, पण सगळं समोर येईल”, असं राऊत म्हणाले.
भाजपावर साधला निशाणा
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “आम्ही सगळे पुरावे ईडीकडे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाला दिले आहेत. पण त्यावर कारवाई झालेली नाही. भाजपामध्ये असं कुणीच नाही का? की सगळे रस्त्यावर भीक मागत बसले आहेत? कुणी चणे विकतंय, कुणी भेळपुरी विकतंय, कुणी पावभाजीच्या गाड्या लावल्यात. असं काही आहे का? आम्ही ईडी, पंतप्रधान कार्यालयाकडे पुरावे दिले आहेत. पण त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नाही”, असं राऊत म्हणाले आहेत.
“श्रीधर पाटणकरांवरच्या कारवाईमागचं सत्य तज्ज्ञ मंडळींनी समजून घेतलं पाहिजे की हे सगळं कशासाठी झालंय? चुकीच्या माहितीसाठी हे सगळं पसरवलं जात आहे. ही बदनामीची मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. या कारवाईचं भाजपाकडून समर्थन केलं जात आहे. ही हुकुमशाहीची नांदी आहे.”, असं देखील राऊत म्हणाले.