गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या विधानावरून विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श झाले, आजचे आदर्श नितीन गडकरी, शरद पवार आहेत”, अशा आशयाचं विधान राज्यपालांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं. त्यानंतर राज्यपालांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. खुद्द ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना महाराष्ट्रातून परत पाठवा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांना वाढता विरोध सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरू लागला असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच, हा राजद्रोहासारखा गुन्हा असल्याचं ते म्हणाले आहेत.
‘हा राजद्रोहासारखा गुन्हा’
सामनामधील ‘रोखठोक’ या आपल्या सदरातून संजय राऊतांनी या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींप्रमाणेच भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही “शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाला तडजोडीसाठी पत्रे पाठवली होती”, असं विधान करून वादाला तोंड फोडलं. यासंदर्भात संजय राऊतांनी राज्य सरकारव टीकास्र सोडलं आहे. “शिवरायांचा अपमान राज्यपालांनी पहिल्यांदाच केलेला नाही. याआधीही तो वारंवार केला आहे. राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी ही मागणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. अशा राज्यपालांचे व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन हा राजद्रोहासारखा गुन्हा आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता”; रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सावरकर जेव्हा…”
“मोदींनी ही घोषणा शिवाजी महाराज कालबाह्य झाले म्हणून केली का?”
दरम्यान, या लेखात संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. “भारतीय नौदलाच्या झेंड्यावर आत्तापर्यंत गुलामगिरीचे निशाण होते. पण आता इतिहास बदलून टाकणारे काम आपण केलेय. आज भारताने गुलामगिरीचे ओझे झेंड्यावरून पुसून टाकले आहे. आजपासून भारतीय नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे. तो आपण नौदलाचे प्रणेते छत्रपती शिवरायांना समर्पित करत आहोत’ ही घोषणा मोदींनी केली ती काय महाराज कालबाह्य, जुने-पुराणे झाले म्हणून?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
“महाराष्ट्र बंदचीच हाक द्यायला हवी”
“शिवाजी राजांविषयी पंडित नेहरू ते मोरारजी देसाईंनी चुकीची विधाने केल्यानंतर खवळलेल्या महाराष्ट्राने त्यांना माफी मागायला भाग पाडले होते. तोच महाराष्ट्र आज थंड, लोळागोळा होऊन पडला आहे. मागे एका प्रकरणात छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अपमान झाला म्हणून संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना सांगली बंद केले. पण आज शिवरायांचा भाजपकृत अपमान होऊनही ते गप्प आहेत. या प्रश्नी सर्व शिवप्रेमी संस्था व संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र बंदची हाक द्यायला हवी”, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.
“काळ मोठा कठीण आला आहे”
“इकडे राज्यपाल शिवराय जुने-पुराणे झाले असं म्हणतात तर तिकडे भाजपाचे नेते सुधांशू त्रिवेदींनी शिवाजी राजांनी औरंगजेबास तडजोडीची पाच पत्रे पाठवली म्हणजे माफीच मागितल्याचं म्हणत महाराष्ट्राची मने दुखवली. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपमानाच्या विरोधात साधा निषेध केला नाही. उलट त्यांचा बचाव केला. असे आक्रित इंग्रजकाळातही घडले नव्हते. म्हणूनच काळ मोठा कठीण आला आहे असेच म्हणावे लागेल”, अशा शब्दांत संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.