हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर आता मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. हे अधिवेशनही हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच सत्ताधारी आणि विरोधकांमधील कलगीतुऱ्याने गाजण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर सुरू झालेल्या टोलेबाजीवरून हीच शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर खोचक शब्दांत हल्लाबोल केला आहे. शिंदे गटाला त्यांनी टोळीची उपमा दिली असून त्यावरून टीकास्र सोडलं आहे.
गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून टोला
संजय राऊतांना माध्यम प्रतिनिधींनी शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्याबाबत विचारणा केली असता संजय राऊतांनी त्यावरून परखड शब्दांत टीका केली. ‘आम्हाला भाजपाने एकही जागा दिली नाही तरी चालेल’, असं गुलाबराव पाटील म्हणाल्याचं पत्रकारांनी विचारलं असता संजय राऊतांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. “कारण जे मिंधे असतात, मांडलिक असतात, त्यांना स्वत:चं अस्तित्वच नसतं. ते भाजपामध्ये विलीन झाले आहेत. त्यांच्यातला स्वाभिमान संपलेला आहे. त्यांना शिवसेनेबरोबर भाजपाची युती करायची होती. पण आता ते आपला पक्ष भाजपात विलीन करत आहेत. त्यामुळे त्यांना एकही जागा नकोय. शिवसेना मात्र यापुढेही संघर्ष करत राहील”, असं संजय राऊत म्हणाले.
“…तो आमच्यासाठी दुःखाचा क्षण होता” गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंविषयी व्यक्त केली खंत
“त्यांचा एक गट आहे. टोळी आहे. टोळीला अस्तित्व नसतं. टोळी गँगवॉरमध्ये किंवा पोलीस एनकाऊंटरमध्ये मारली जाते. हे स्वत:ला टोळी मानत असतील तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांना एकही जागा नको. जितके दिवस आहेत, तितके दिवस खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा असं त्यांचं नियोजन असेल”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
‘धर्मवीर’ वादावरून भाजपाला सुनावलं
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी संभाजी महाराजांचा ‘धर्मवीर’ उल्लेख करण्यावरून भाजपाला सुनावलं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं मांडलेल्या भूमिकेवर भाजपानं आक्षेप घेतल्यानंतर त्यावरून राऊतांनी भाजपाच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराज हे माफीवीर होते का? ते जुने-पुराणे नेते होते, आता त्यांचं महत्त्व नाही हे राज्यपालांचं विधान भाजपाला मान्य आहे का? यावर आधी उत्तर द्यावं. शिवाजी महाराजांचा अपमान हा सगळ्यात मोठा अपमान आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो आणि तिथेच संपतो. इतर राज्यांना भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. शिवाजी महाराज इथे जन्माला आले म्हणून हा इतिहास आहे. महाराष्ट्रानं राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यावर भाजपानं आपलं मत आधी व्यक्त करावं. सुरुवात करायची आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या विषयापासून करावी लागेल. त्यावरून तुम्ही लक्ष दुसरीकडे वळवू शकत नाही”, असं राऊत यावेळी म्हणाले.