शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर मोठी फूट पडली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार जाऊन एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार अस्तित्वात आलं. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट या शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये विस्तवही जात नसल्याचं चित्र दिसत आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्ही गट सोडत नाहीयेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी फारकत घेतल्याची टीका शिंदे गटानं केली आहे. तर एकनाथ शिंदे आणि इतर ४० बंडखोर आमदारांनी पक्षाशी ‘गद्दारी’ केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारपासून विविध ठिकाणी भेट देणार आहेत. यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य असलेल्या राजगृहला ते भेट देणार आहेत. त्यानंतर राजभवनवरील रोजगार मेळावा आणि नंतर इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा ते घेणार आहेत. मात्र, संध्याकाळी पाचच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौर बंगला परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा आढावाही घेणार आहेत. तसेच, संध्याकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करणार आहेत.
“बाळासाहेब ठाकरे संपूर्ण विश्वाचे”
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला भेट देणार असल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खोचक सल्ला दिला आहे. “बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. कुणीही असतील. मी कुणाचं व्यक्तीगत नाव घेत नाही”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“बाळासाहेब ठाकरे सगळं पाहात आहेत”
“काय होतंय, काय होऊ घातलंय हे सगळं बाळासाहेब ठाकरे पाहात आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठित जे लोक खंजीर खुपसतात, त्यांचं कधी भलं झालेलं नाही हा इतिहास आहे. सगळेच बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊ शकतात, पण चांगल्या मनाने जा”, असंही संजय राऊत म्हणाले.