गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील गावांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील गावांना महाराष्ट्रात सहभागी होण्याची इच्छा असल्याचं सांगितलं जातं. कर्नाटककडून मात्र सीमाभागातील गावांवर आमचाच अधिकार असल्याचा दावा केला जात आहे. त्यात आता सांगलीतील जत तालुक्यातल्या ४० गावांवरही दावा करण्याची तयारी बोम्मई सरकारने केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्या मुद्द्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटमुळे वादाला सुरुवात
बसवराज बोम्मई यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्देशून केलेल्या ट्वीटनंतर हा वाद अधिकच तीव्र होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केलं असून, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे”, अशा शब्दांत बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारला उद्देशून ट्वीट केल्यानंतर त्यावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे. “महाराष्ट्रात अत्यंत कमजोर, दुर्बळ सरकार अस्तित्वात आल्यामुळे आणि सरकारचे प्रमुख देवधर्म-तंत्रमंत्र ज्योतिष यात अडकल्यामुळे कर्नाटक किंवा गुजरात अशा अन्य राज्यांतून महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत. कुणी आमचे उद्योग पळवतायत, कुणी आमची गावं पळवतायत”, असं संजय राऊत म्हणाले.
“यावर ठाम भूमिका घेऊन आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उभे राहात नाहीत. ‘फक्त हे शक्य नाही, एकही गाव जाणार नाही’ असं बोलून चालत नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. आत्तापर्यंत कोणत्याही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अशी हिंमत झाली नव्हती. ते मुख्यमंत्री भाजपाचे आहेत आणि तुम्हीही भाजपाचे राज्यकर्ते आहात हे लक्षात घ्या. आतून काही संगनमत चाललंय का? गुजरातनं महाराष्ट्राचे उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने महाराष्ट्राची गावं, तालुके पळवायचे आणि हा महाराष्ट्र नकाशातून खतम करायचा, दुसऱ्या बाजूला भाजपाचे लोक शिवाजी महाराजांवर हल्ले करत राहून आमचं मनोधैर्य खच्ची करायचं अशा प्रकारचं षडयंत्र पडद्यामागे रचलं जातंय का अशी भीती वाटतेय”, अशा शब्दांत संजय राऊतांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे.
“महाराष्ट्राचं सरकार कमजोर”
“महाराष्ट्राचं सरकार कमजोर, मिंधे, दुर्बल असेल. पण आजही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रावर आलेलं प्रत्येक संकट परतवून लावेल. १०६ हुतात्मे झाले आहेत. आम्ही आणखीन हुतात्मे देऊ. रक्त सांडू. आम्हाला तुरुंगाची भीती नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, ज्यानं ६९ हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगलाय, आम्हीही भोगू. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मी शिवसेनेकडून इशारा नाही देत, धमकी देतोय समजा. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा. हे घेऊ, ते घेऊ ही तुमची बकबक बंद करा. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. आमचं सरकार जरी सिलेंडर वर करून गुडघ्यावर बसलं असलं, तरी शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे हे विसरू नका”, अशा शब्दांत राऊतांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
“मी सीमाभागात याआधीही गेलोय, परत जाईन. मी गांडू नाही. शिवसेना गांडूंची औलाद नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सीमाभागाची जबाबदारी होती. ते गेल्या १० वर्षांत अजून का गेले नाहीत? किती मंत्री सीमाभागात गेले? चंद्रकांत पाटील जातात आणि कन्नड राष्ट्रगीत म्हणतात. तिथे त्यांचंच कौतुक करून येतात. हा आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आम्ही जाऊ आणि लढू. प्राण गेला तरी हरकत नाही. सरकार कुणाचं आहे याची आम्हाला पर्वा नाही. आमचं सरकार असतं, तरी आम्ही गेलो असतो”, अशा शब्दांत राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
शिंदे सरकारवर हल्लाबोल
“कुठे गेलाय तुमचा स्वाभिमान? कुठे शेण खातोय तुमचा स्वाभिमान? बाजूच्या राज्यातला एक मुख्यमंत्री आमची गावं खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय, एक राज्य आमचे उद्योग खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे. षंढासारखे बसलात तुम्ही”, अशी टीकाही राऊतांनी यावेळी बोलताना केली.